शनिवार, ३० जानेवारी, २०१६

प्रिय बापू, तुम्हाला विनम्र अभिवादन !


प्रिय बापू,
      तुम्हाला विनम्र अभिवादन ! 
     काल तुमची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त तुमच्या सत्य , अहिंसा , स्वदेशी ह्या  सा-याच गुणांचं स्मरण केलं बरं आम्ही. एवढंच नाही तर त्यावर व्याख्यानही भरवलं होतं. फक्त कालच नाही , दरवर्षी नित्याने करतो हे सारं आम्ही. एक तुमच्या जयंतीला अन दुसरं ते पुण्यस्मरणाला. 
          चार दिवसापूर्वी प्रजासत्ताकाला कानावर एक घोषणा पडली . तशी लहानपणापासूनच घोकत आलोय आम्ही ती. "एक रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा"....! पण आता विचार करावासा वाटतोय या घोषणेचा . सारा देश तुमचा झाला बापू पण तुम्हाला मात्र कधीच या देशाने आपलं मानलंय का ? तुमच्या मागे ना कोणी जात ना धर्म यासाठी टीपं गाळताना पाहिलंय आम्ही तुम्हाला कुसुमाग्रजांच्या कवितेत.....!
    बापू, आज तुमच्या नावाने एक विचारसरणी उदयास आलीय. आम्ही तिला गांधीवादी विचारसरणी म्हणतो. पण बापू तरीही आज भांडतोय आम्ही तुमचं जाणं हे 'वध' होता कि 'हत्या' यावरून ! त्या दिवशी तर एक सो कॉल्ड पुरोगामी म्हणवून घेणाऱ्याच्या गाडीवर "होय! मी 'तोच' गोडसे ...." लिहिलेलं वाचलं. मन अगदी सुन्न झालं ते वाचून . तुमच्या हत्येचं समर्थन होऊच कसं शकतं हेच कळत नाही अजून . 
    आजचा युवान तर वयाच्या विसाव्या वर्षीच विचाराने वृध्द झालाय बापू. तुमचे सत्याचे प्रयोग आम्ही कधी वाचलेच नाही अन वाचलेच तर कधी पचले नाही . जातिवाद, प्रांतवाद ,भोगवाद असल्या वादांमध्ये गुरफटून गेलोय आम्ही .....
        माझा एक मित्र त्याच्या एका कवितेत खूप मार्मिक लिहितो की, "आजही तुमचं स्मरण नित्यानं करतोय आम्ही पण अनुकरण मात्र निमित्ताने ...." खरय त्याचं. 
     तुमच्या सारख्या सत्पुरुषांच्या पुतळ्याकडे बघून तुमच्या विचारांचं अनुकरण करावं हा हेतू असताना आम्ही मात्र फक्त पुतळ्याच्या अनावरणाचे सोहळेच घडवून आणले.
     तसे तुमचे स्मरण आम्हाला नित्याने होते बरं बापू. रोज तुम्हाला स्मरतो , पुजतो आणि खिशात घेऊन फिरतो. कुठे काळ्या तर कुठे पांढऱ्या रंगामध्ये .....
     तसं पाहायला गेलं तर आमच्या मुळाक्षरांची सुरुवातच 'अ' या अक्षराने होते पण तुमच्या अहिंसेतला 'अ' मात्र कधीच आमच्या स्मरणात राहिला नाही. 
   म्हणून मी मागे तुमच्या जयंतीलाही तुम्हाला बोललो होतो बापू , तुम्हाला परत यायचं असेल तर खुशाल या , पण सत्य , अहिंसा अन स्वदेशीचा नाद सोडणार असाल तरच !!!
                                                                                     
   -तुषार निवृत्ती वाजे (नाशिक)
संपर्क -9273572706

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा