गुरुवार, २ एप्रिल, २०२०

खरंय... नात्यात ब्रेक गरजेचा असतो..


खरंय...
नात्यात ब्रेक गरजेचा असतो...
तू तिथे मी इथे.... 
तुझी कामं वेगळी असतात 
अन माझी कामं वेगळी...
आपल्या कामातून , दिवसांतुन काही क्षण भेटतात...
ते एकमेकांना दिले की मग
दूर असलेली आपल्यातली अंतरे मिटल्यासारखी वाटतात. 
त्यात तू तिथून माझी काळजी करतेस
मी इथून तुला जपण्याचा प्रयत्न करतो. 
तुला मोबाईल नामक खिडकीतून बघत राहतो कित्येक वेळ एकटक....
वेळ थांबवुन ठेवावा वाटतो काही काळ अन बघत रहावं वाटतं तुला मनसोक्त. 
बघता बघता एकमेकांना कधी पाणावतात डोळे.... कधी हसू येतं गालावर....
कधी तिथून तू गायला सुरू करते मग मी बनतो तुझा एकटा उपस्थित असलेला श्रोता. तू गात असतेस जगाची पर्वा न करता मन भरेपर्यंत अन मी बघत असतो तुला गाताना एकटक डोळे भरपर्यंत...❤️
माझे डोळे भरले की विचारतेस तू काय झालं ?
मग माझ्या कपाळावर अशा वेळीच लख्ख दिसणारी शीर बघून समजतात तुला कारणं सारी...
रोज तुझी तब्येत, जेवण, काम सगळ्याची विचारपूस होते. तू खाऊ घालते तिथून मोबाईल च्या स्क्रीनकडे हात नेऊन. मी ही मग भातुकलीच्या खेळासारखं घास खाल्ल्याचे दाखवतो. अंतर दूर असलं की मोबाईल हीच खिडकी आपली वाटू लागते एकमेकांना जवळ आणण्यासाठी.
मी ओरडतो नेहमी तुला तुझ्या आळसावरून... तू मला मी मोबाईल जास्त वापरतो यावर ओरडते...❤️
तुझं शेड्युल चुकलं की माझी चिडचिड होते.... माझाही दिवस वाया गेला की तू ओरडते....
मग सुरू होतात किरकोळ भांडणं आपल्यात....
तुला वाटतं मी माघार घ्यावी मला वाटतं तू चूक मान्य करावी...
शब्दाने शब्द वाढत जातो...
आवाज मोठा होत जातो....
मोठा झालेला हा आवाज आपल्यात आधीच रस्त्याने दूर असलेलं अंतर मनातूनही दूर करू लागतो. तुला तुझं स्वातंत्र्य हरवल्यासारखं वाटतं मला वाटतं जपावे तु माझे काही हक्क....
शेवटी फोन आदळले जातात... मग फोनवर न बोलता आलेलं मनातलं सगळं टेक्स्ट मधून ओकलं जातं... सुरू राहतो हा खेळ काही मिनिटे....
भांडता भांडता तू offline गेलीस की परत माझी चिडचिड होते....
मी उत्तर नीट दिले नाही तर तू रागावतेस....
सुरू राहतो हा खेळ नेहमीच आपल्यात.....कित्येक दिवस झालेत...
मग काही काळ बोलायचं नाही आपण हा निर्णय घेतला जातो....तू म्हणतेस माझी इच्छा नाही बोलायची मी तसंच काहीसं बडबडतो.
मग ठरतं आपण नात्यात घेऊया ब्रेक...काही काळ....जपुया एकमेकांची स्पेस....जगू देऊ एकमेकांना हवं तसं काही काळ....
.
ब्रेक सुरू होतो....
पहिला राग whatsapp च्या प्रोफाइल फोटो वर निघतो.
तो उडवला जातो... नेट बंद करून मोबाईल बाजूला फेकला जातो....
फोन ठेवताना साखर घेतल्याशिवाय सवय नसलेल्या मला असा फोन ठेवला म्हणून अधिक वाईट वाटतं. सगळं रितं वाटू लागतं. एकटं राहण्यासाठी मागितलेल्या वेळात एकाकी झाल्याची भावना येते मनात.
पुन्हा आपल्या कामात मन गुंतवावं वाटतं. केला जातो प्रयत्न पण लागत नाही मन कशातही.....
एकट्याची चिडचिड अजून वाढते...
तुझही होत असावं बहुतेक तसेच काहीसे....
काही वेळ निघून जातो मध्ये.... 
मग अचानक Involuntary हालचाली प्रमाणे तुला "काय करतेस ?" msg type केला जातो पण येतं लक्षात आपण घेतलाय ब्रेक नात्यात.... 
परत बॅकस्पेस दाबून सगळं इरेज केलं जातं. फोन बाजूला ठेवला जातो. 
पुन्हा काही काळ निघून जातो मध्ये.
.
तुझं माझं उठणं, अंघोळ ,नाश्ता, चहा, जेवण ,आराम, काम, सायंकाळ, पुन्हा जेवण, आजार, जखमा,औषधांची नावं, घर, घरची स्थिती, एकमेकांच्या घरातले वादविवाद, प्रॉब्लेम्स , सगळ्या तारखा हे सगळं सगळं एकमेकांना ठाऊक असतं किंबहुना आपण share करतो ग. पण आज सगळं थांबल्यावर कळतं की तू सवय नाहीये व्यसन आहेस माझं. तुझ्याशिवाय नाही येत जगता... हसणं हरवतं.... डोळे पाणावतात. मी एकाकी पडतो. 
तुला हसत असताना बघणं आणि तुला हसवणं मला माझी जबाबदारी वाटते. तुला रडताना बघितलं की मी हरल्यासारखं वाटतं.आज तू असं चिडून , ओरडून, रडून फोन ठेवल्यावर काय अवस्था असेल माझी. 
तुझ्यापासून काही काळ दुर राहिलो की तुझ्या अजून जास्त जवळ आलोय हे लक्षात येतं. नाही राहता येत तुझ्या शिवाय हे उमगू लागतं. 
पुन्हा काही वेळ जातो मध्ये...
नात्यातल्या ब्रेक मुळे कळतं की किती गरज आहे मला तुझी.... 
तुलाही माझी असेल का?
फोटो सौजन्य : Google images 

शेवटी न राहवून तुला कॉल करायचा म्हणून मोबाईल हातात घेतो . तेवढ्यात 

तुझाच इनकमिंग कॉल नोटिफिकेशन दिसू लागतं. असंख्य विचार क्षणात डोक्यात येऊन जातात. 
फोन उचलतो....काहीच बोलत नाही मी.
तिकडून तुझा गहिवरलेला आवाज येतो....
"Missing you Partner" 😥

मी ही जोराचा उसासा घेतो...गहिवर आवरतो. 
अन बोलतो...
"I MISSED YOU ALOT" ❤️
.
बघ ना, कधीकधी मोबाईलला सुद्धा नेटवर्क नीट येण्यासाठी किंवा हँग झालेला मोबाईल चांगला चालावा म्हणून करतोच ना आपण मोबाईल reboot. 
तसंच काहीसं असतं नात्याचं सुद्धा. 
एकमेकांशी बोलत राहून भांडत बसण्यापेक्षा थोडा ब्रेक घेऊन एकमेकांना एकमेकांची किंमत, आयुष्यात जोडीदाराची गरज कितीय हे स्वतः उमगू देणं कधीही चांगलं.
म्हणून, 
खरंच नात्यात एक ब्रेक गरजेचा असतो.....
एकमेकांच्या अजून जवळ येण्यासाठी... 😇❤️

#तुझाच पार्टनर ❤️

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

पैशाची गोष्ट....

....माणसांना  वापरून पैसे कमविण्यापेक्षा पैसा वापरू अन माणसे जोडुयात ना....!

         सन 1996-97 असेल. म्हणजे अगदी बालवाडीत किंवा पहिली दुसरीत असण्याचा काळ तो. आजच्या सारखं कुरकुरे, जेम्स, किंडर जॉय वा कॅडबरी (आम्ही कॅडबरी हे 'विशेषनाम' म्हणून न वापरता 'सामान्यनाम' म्हणूनच वापरतो....सर्व मोठी व लांब चॉकलेट्स आमच्यासाठी कॅडबरीच....असो ) असलं काही मिळत नव्हतं. त्यातलं काही मिळत असेलही पण ते कधी आमच्या आयुष्यात डोकावलंही नव्हतं कधीच.
       म्हणतात की 90च्या दशकात जन्मलेली मुलं भाग्यवान आहेत खूप. कारण त्यांनी जुनं जगही अनुभवलं अन नवं बदलणारं जगही अनुभवताय. त्या भाग्यवंतांपैकी मी एक.

       विसेक वर्षांपूर्वीचा काळ तो. तेव्हा अगदी 5-10 पैशात दोन मुठीभारून खोबऱ्या गोळ्या मिळायच्या. अन चार आण्यात तर खिसेभरून....!
      अगदी लख्ख आठवतंय... घरातून 10-20 पैशे मिळाले की आमचा आनंद गगनात मावत नसे. आजी आजोबा हे तर आपली लहानपणीची RBIच होते. हे असे गोळ्या बिस्किटांना 10-20 पैसे मागण्यासाठी ते सर्वात हक्काचे.
    आलेले पाहुणे सुद्धा जाताना आजच्यासारखे शंभराची नोट नव्हते देत हातावर. खिशात हात घालून 10-20 पैसे अन फार फार तर चार आणे आठ आणे हातावर टेकवत. पण तेवढ्या पैशाचा केवढा मोठ्ठा आनंद होत असे काय सांगू... मग आमची स्वारी मित्र गोळा करून उड्या मारत मारत सिकंदर शेठच्या दुकानात निघायची. तेव्हा 5-10 किंवा 20 पैसेे तेवढ्या एकाच दुकानात घेत असे. तेवढ्या 10-20 पैशात आम्ही खिसेभरून खोबऱ्या गोळ्या, आस्मानताराच्या गोळ्या किंवा खारे बिस्किटं घेऊन येत. हल्ली तसल्या गोळ्या कुठं मिळतच नाहीत अन मिळाल्या एखाद्या जुन्या टपरीवर तर एका रुपयांमध्ये 5-6 गोळ्या मिळतात....


     खरंच मंतरलेले दिवस होते ते. काळ जसजसा पुढे सरकत गेला त्या पैशांचे मूल्य सरत गेले. (...नंतर RBI नं 1997 मध्ये 5 पैसे, 10 पैसे अन 20 पैसे चलनातून बाद केले. 25 पैसेही अलीकडेच म्हणजे 2011 मध्ये बाद केले. 50 पैसे अजूनही चलनात आहे ही गोष्ट बहुतांशी लोकांना माहीत नसावी. कुणीच ते व्यवहारात स्वीकारत नाहीत ही बाब निराळी.)

      मला कधी कधी खरंच हेवा वाटतो स्वतःचा.... आमच्यासारखं बालपण हल्ली कुणालाच नाही मिळत. आम्ही बालपण 'जगलो'....आज लहानग्यांना बालपण फक्त भेटतं , ते 'जगता' येत नाही.

       तर आज हे सारं पैसा पुराण आठवण्याचं कारण म्हणजे आज 30 नोव्हेंबर 2017 . बरोबर 100 वर्षांपूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 1917 रोजी भारतात पहिल्यांदा 1 रुपयाची नोट चलनात आणली गेली. तेव्हा ती इंग्लडमधून छापून यायची. त्यावर किंग जॉर्ज पाचवा याचे चित्र असायचे. तशा नोटा भारतात 1961पासूनच छापत असत. परंतु नंतर असं झालं की, 1916-17 ला म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात तेव्हाचे 1 रुपयांचे नाणे जे की चांदीचे असे ते वितळवून युध्द साहित्य बनवायला वापर होऊ लागला. ही बाब लक्षात येताच सरकारने ते नाणे बंद करून 1 रुपयाची नोट प्रथमतः चलनात आणली.
तेव्हाची थोडी आकडेवारी लक्षात घेतली तर डोळे विस्फारले जातात. तेव्हाचे 1 रुपयाचे नाणे हे चक्क 10.7 gms चांदीच्या बरोबर होते. म्हणजे त्याची आजचे मूल्य बघितले तर आज 10gms चांदीचा बाजारभाव 400 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 100 वर्षात रुपयाचे मूल्य 400 पट कमी झाले. आजी सांगायची की आमच्या काळात रुपया गाडीच्या चाकाएवढा होता. तेव्हा हसू यायचं त्या वाक्याचं. हल्ली उलगडू लागलाय अर्थ त्याचा.
      ह्या 1 रुपयाच्या नोटा भेटायला आज दुर्मिळ जरी असल्या तरी आजही चलनात आहेत...भेटतात त्या....(माझ्याकडेही तीन आहे बरं का ....! 😉)
      ऑनलाईन भेटलेल्या माहितीनुसार 1 रुपयाच्या 100 नोटांच्या बंडलची किंमत सन उत्सवाच्या काळात 15 हजार रुपये असते. (म्हणजे माझ्याकडं ह्या हिशोबाने 4500 रुपये आहेत राव 😊  )

             असो...पैसा येतो...जातो....पैशाचे मूल्य वाढते.... कमी होते.....पण आजच्या काळात काय झालंय ना, पैसा कमविण्यालाच अधिक महत्व आलंय.
    वपु काळे म्हणतात की , " बेदम पैसा मिळवणं ह्याच्याइतकं मिडीऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं..."
म्हणून मी काय म्हणतो, आपण पण माणसांना वापरून पैसे कमविण्यापेक्षा पैसा वापरू अन माणसे जोडुयात ना.....! 

✍ तुषार वाजे (नाशिक) 
☎ 9273572706

#पैशाची_गोष्ट #रुपयाच्या_नोटेची_शंभर_वर्ष #जाणिवांचा_दुष्काळ #माणूसपण_हरवतं_तेव्हा....

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

#15Bikes_32मित्र_अन_एक_भन्नाट_दिवस..#G2G

#Get_Together #G2G #12th_Science_Batch_2007_2009
#15Bikes_32मित्र_अन_एक_भन्नाट_दिवस
आज खूप वर्षांनी साऱ्या
जुन्या यारांची भेट झाली
Whatsapp वर नव्हे fb वर नव्हे
गळाभेट घेत थेट झाली.....✍🏻

       काही दिवसांपूर्वीची गोष्ट.... Whatsapp वरील 12th च्या मित्रांच्या ग्रुपवर एका मित्राची एक पोस्ट येऊन पडते...... "Get Together करायचं का रे ?" बघता बघता हो-नाही हो-नाही रिप्लाय मिळू लागतात... काही मित्र पुढाकार घेतात....सारं सारं जुळून येतं.... तारीख ठरते...ठिकाण ठरतं....अन शेवटी तो भेटीचा भन्नाट दिवस उजाडतो.... एक एक मित्र आपल्या bikeवर जिथं कॉलेज केलं तिथं जमू लागतो....बघता बघता 15-20 Bike अन 30-35 मित्र कधी जमतात कळतही नाही....... प्रत्येक जण एकमेकांना मिठी मारतो....जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.....त्या जवळ जवळ 7 ते 8 वर्षांनी .....!!!!

दिनांक 02 Nov 2016...ठिकाण-टाकेद.... 
सन 2007-2009 च्या 12th Science च्या batch चं Get Together(G2G)....खरंच काय भन्नाट दिवस होता...अविस्मरणीय !
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ज्यांना वेळ मिळाला (काहींना मिळाला नाही तर काहींनी मुद्दाम काढला नाही...त्यांच्या बद्दल राग मुळीच नाही पण एका अवर्णनीय आनंदाला ते मुकले याबद्दल त्यांची कीव येते इतकंच !)
असे 30-35 मित्र भेटलो. काही सोंगणी सोडून तर काही मेडिकल बंद करून, काही पोलीस मित्र रात्रीची duty करून तर Army वाला सुट्टी घेऊन....तर काही आपापल्या अनेक व्यग्र कामातून वेळ काढून जमले होते.
अनेक जण ओळखायलाही येत नव्हते इतके वेगळे दिसू लागलेय. काही जसेच्या तसे दिसतायत. ज्यांना कॉलेजात मिशीही नव्हती ते दाढी मिशी ठेवू लागलेत. काळासोबत काहींचे केस विरळ होऊ लागलेत तर काहींचे पांढरे... पण सार सारं अगदी पहिल्यासारखं वाटत होतं.
टाकेद मध्ये भेटून सर्व गाड्या वळल्या आम्हा सर्व मित्रांची भेट घडवून आणणाऱ्या आमच्या कॉलेजकडे ....।
     सर्व जणांनी तिथं कॉलेजच्या इमारतींसमोर ग्रुप फोटो काढले..अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.... सर्व  शिक्षकांच्या आठवणी आल्या...
सन-2007-2009 12वी (विज्ञान) मित्रपरिवार....

       कॉलेजातून काही मित्रांना रजा देऊन उरलेल्या #12Bike_अन_24मित्रांची स्वारी निघाली थेट #रंधा_Fall इथं ..... Bike प्रवासात इतका आनंद असतो हे प्रथमताच अनुभवलं... रंधा फॉलला जाऊन सर्वांनी अनेक आठवणींना फोटोत कैद केलं. घरून आणलेला दिवाळीचा फराळ खाल्ला.... तिथंच 4PM झाले. तिथं अजून काही मित्रांनी रजा घेतली...
तिथून उरलेल्या #9Bike_अन_18मित्रांची स्वारी वळली भंडारदऱ्याच्या दिशेनं(एका मित्राची bike पंक्चर झाल्यानं तो अन सोबतचे 2 जण पुढं येऊ शकले नाही...) ..... तिथं पोहोचल्यावर 4-5kg चिकन🐔 घेऊन एका हॉटेलात शिजवायला दिलं. जेवण तयार होईपर्यंत मग तिथंच डॅम शेजारी सारे मित्र गोल करून बसले अन बरसू लागला गप्पांचा पाऊस...!
गप्पांचा पाऊस.....

        गप्पांचा विषय ठरलेला ! प्रत्येकानं 12वी नंतरचा 7-8 वर्षाचा प्रवास सांगायचा....अन सोबतच आजवरचे आपापले क्रश किती? अन इथं न सांगता येणाऱ्या एका आपुलकीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरलं..... 
     सर्वजण इतरांचे अनुभव कथन ऐकून कधी हसत हसत लोटपोट होत होते....तर कधी मित्रांच्या कहाण्या ऐकून उर भरून येत होता..... अनेक जण इंजिनीअर झालेत..अनेक घरचा किंवा नवीन व्यवसाय करताय....कोणी शिक्षक झालंय तर कोणी तलाठी..... कोणी पोलिसात तर कोणी आर्मी मध्ये गेलंय. काही जण डॉक्टर झाले कोणी स्वतःचं मेडिकल सुरु केलं तर काही जण स्पर्धा परीक्षेत आपलं नशीब आजमावताय(त्यात आम्ही पण) ....! खरंच , सर्व मित्र खऱ्या अर्थाने मोठे झाले होते !
   गप्पांच्या ओघात कधी सायंकाळचे 7 वाजले ते कळलंच नाही. तोपर्यंत चिकन शिजलं होतं. सर्वांना प्रचंड भूकही लागली होती.... सर्वांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारला...(नॉनव्हेज न खाणारी 4 पोरं उपाशी मेली राव.... नॉनव्हेज बरं असतं असं पहिल्यांदा वाटलं लाईफमध्ये तसंच जेवण अन ते हॉटेल कुणीच आयुष्यभर विसरणार नाही बरं का ....) 
जेवून निघायला 8.45Pm झाले .... सर्व Bike पुन्हा शेवटी चहा/कॉफी/Sprite घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या..... वासाळी घाट आल्यावर सर्व bike पुन्हा थांबल्या कारण तिथून अनेक गाड्यांचा मार्ग बदलणार होता......
  रात्रीच्या 9.15 वाजता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घाटातच चालू झाला.... तो खालीलप्रमाणे..
-सर्वप्रथम G2G चं आयोजन केल्याबद्दल महेश (बुंट्या) चे आभार....प्रचंड टाळ्या 😃
-आयोजनाला हातभार लावल्याबद्दल पाटलाचे(स्वयंघोषित आमदार) आभार...टाळ्या अन हशा 😝
-दिवाळीचा फराळ खाऊ घातल्याबद्दल माझे(तुषार) आभार.....टाळ्या....!
-21MP कॅमेरासाठी CM साहेबांचे आभार....आता जरा जोराच्या टाळ्या !!
-सोबत एकमेव असलेलं शिरस्त्राण(हेल्मेट) पूर्ण प्रवासभर परिधान केल्याबद्दल(पोलीस ही नियम पाळतात बरं का !😁) अर्जुन(म.पोलीस)चे आभार.....
-अंकुशने दिलेल्या पुंगळ्यांसाठी अंकुशचे आभार...प्रचंड टाळ्या 
-अन अर्जुनने खाऊ घातलेल्या केळींसाठीही त्याचे आभार......टाळ्या 
-G2G साठी पोलीस protection पुरवल्याबद्दल अर्जुन(म.पोलीस) चे पुनःश्च  आभार...टाळ्या....
-केंद्राकडून G2G साठी आर्मी protection ही मिळाले त्यासाठी सोमेश(Indian Army) चे आभार...टाळ्या 
  अन शेवटी सर्वांनी आल्याबद्दल एकमेकांचे आभार मानत अन कितीही मोठं झालं तरी पाय जमिनीवर राहू देण्याचं वचन देत अन पुन्हा काही वर्षांनी नक्की भेटू असा शब्द दिला तोवर  रात्रीचे 9.30 झाले होतेे.... सर्वांच्या गळाभेटी घेत शेवटी Bike Start केल्या..... काही मिनिटांत माझा खेड चा Stop आला....माझी Bike डावीकडे वळली.... मी सर्वांना हॉर्न दिला....त्यांनीही मला हॉर्न दिला...अन सर्व गाड्या पुढे निघून गेल्या.....जसे पक्षी परततात आपापल्या घरट्याकडं अगदी तशाच...
   आता मागे उरले होते ते त्यांच्या गाड्यांचे दुरून दिसणारे अंधुक दिवे....अन...आयुष्यभर पुरतील अशा भन्नाट भेटीच्या आठवणी....!

✍🏻#तुषार_वाजे
03 नोव्हेंबर 2016

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

📚शिक्षक दिन...📖 ०५ सप्टेंबर २०१६....🎓✍🏻

📚शिक्षक दिन .....🎓✍🏻
       आजवरच्या माझ्या जीवनप्रवासात अनेक गुरुवर्य लाभले. प्रथम लाभले माझे आई-बाबा. त्यानंतर शालेय जीवनातले गुरुजी-बाई (गुरुजींचे धोतर-टोपी अन बाईंनी दिलेला धपाटा अजूनही चांगलाच ध्यानात आहे 😃). काही व्यावसायिक अभ्यासक्रमातले तर काही महाविद्यालयातले. काही जीवनप्रवासात कायम साथ दिलेले माझे प्रिय मित्र-मैत्रिण तर कधी कधी गाडीच्या प्रवासात अल्प काळासाठी भेटलेले पण आयुष्यभर पुरेल अशी शिकवण देऊन गेलेले सहप्रवासीही.....!👫👬
           आई-बाबा, गुरुवर्य ह्या साऱ्यांनी जीवन जगायला आणि उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवलं. काहींनी लिहिलेलं वाचायला शिकवलं तर काहींनी माणसं वाचायला. काहींनी मैत्रीतलं प्रेम शिकवलं तर काहींनी प्रेमातील मैत्री. काही गुरूवर्यांनी आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून कसं घायचं हे शिकवलं तर काहींनी दुसऱ्याच्या दुःखात आपण सामील कसं व्हायचं ह्याची शिकवण दिली.
अनेक जणांनी हसायला शिकवलं तर काही रडायचं शिकवून गेले. एकाच माणसाचे अनेक चेहरे काही जण दाखवून गेले. 
         अनेक कवी-लेखकांनीही जीवन समृद्ध केलं. जीवनात रसिकता भरली. त्यापैकी खासकरून व.पु.काळे आणि पु.ल.देशपांडे ह्यांचे नाव अग्रक्रमी येईल. वपुंनी 'माणूस शोधायला' शिकवलं तर पुलंनी हसवता हसवता थेट भावनांना हात घातला......!
      काही गुरुवर्य अंतराने कितीही दूर असले तरी त्यांचा आशिर्वाद, शुभेच्छा कायमच सोबत आहेत. त्यांनीच जगण्याला खरी दिशा दिली. जगण्याला बळ दिलं.
        काही शिक्षक का कुणास ठाऊक पण 'कायम अप्रिय' ह्या श्रेणीतील होते/आहेत, याचीही प्रांजळपणे कबुली देतो. त्यांनीही जीवनाचे अनेक पाठ शिकवले. 
          अशा माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात भेटलेल्या माझ्या सर्व गुरुजनांना आजच्या या *शिक्षक दिनाच्या शतकोटी शुभेच्छा !*
(काही शत्रूही झाले ह्या प्रवासात. ज्यांनी आयुष्यभर पुरेल अशी मोलाची शिकवण दिली. त्यांनाही शुभेच्छा !💐)

सर्वांसाठी ह्या चार ओळी,
"भरकटलेली नौका आमची
गुरुजी तुम्हीच किनारी नेली,
ओबडधोबड दगड होतो
तुम्हीच सुंदर मूर्ती केली.....!"


✍©तुषार वाजे, खेड,ता.इगतपुरी,नाशिक.
दि.०५ सप्टेंबर २०१६(गणेश चतुर्थी)


रविवार, १० जुलै, २०१६

माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓.....

(सन 2015 च्या पहिल्या दिवशी कॉलेजच्या कविता संग्रहासाठी लिहिलेली हि कविता......)

🌹🍁माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓....

कॅलेंडरची बारा पानं बघता बघता संपून गेली🗓
कडू-गोड भूतकाळाची आठवण मात्र ठेऊन गेली.....!

मंगळावरच्या झेपेनं छाती सर्वांची फुलली होती,
आसाम पेशावरच्या हल्ल्यांनी काजळकाठ भिजली होती....!

खून दहशत बलात्काराची गर्द छाया पडली होती,
डोळ्यांचं तर सोडाच मित्रांनो, प्रत्येक पापणी सुद्धा रडली होती.....!

पण जुन्या दुःखाना आता किती उगाळत बसायचं
उलटून गेल्या काळावरती किती दिवस रुसायचं....!

पुढ्यात ठाकलेल्या वर्षासाठी चला नवे संकल्प करू
स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आयुष्यात नवे रंग भरू.....!

स्वप्न आणि आकांक्षांचे लावून नवे पंख,
झटकून टाकूया आयुष्यातल्या निराशेचे डंख....

मंद झालेल्या पणतीसाठी लख्ख नवी वात बनू,
विंदांच्या कवितेमधल्या देणाऱ्याचे हात बनू.....!

लहान मोठ्यांना सामावून घेणारी पुण्यशील जागा बनू,
उसवली मनं जोडणारा आपुलकीचा धागा बनू.....!

तुझं माझं विसरायला लावणारी ऐक्याची प्रीत बनू,
'माणूस' म्हणून जगायचं शिकवील असं 'माणूसकीचं गीत' बनू......!

(पुढ्यात ठाकलेल्या नववर्षाचं चला करूया सोनं, कारण
समोर आलंय एक नवीन कॅलेंडर अन त्याची बारा पानं......)

©✍तुषार वाजे....🍁
दि. 1 जानेवारी 2015.....
http://www.tusharwaje91.blogspot.com

शनिवार, ९ जुलै, २०१६

आरसा......'तो' आणि 'मी'......

🍁आरसा....👥

तिच्यापासून वेगळं झालेल्या त्यानं
आता स्वतःला थोडंस सावरलंय,
डोळ्यांतून निरंतर वाहणारं पाणी
त्यानं कसंबसं आवरलंय.......

आता तो पहिल्यासारखं 
तासनतास रडत नाही....
एकट्यानं कसं जगायचं ? हा प्रश्न
रोजरोज त्याला पडत नाही.....

कोणी म्हणतं ती सोडून गेली त्याला
तर कोणी म्हणतो त्यानंच तिला सोडलं,
पण एकदा मला बोलला होता तो गहिवरून,
"आमचं ना त्या विधात्यानेच मोडलं !"......💔

तिच्या कित्येक आठवणी त्यानं
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवल्यात,
कुणालाही सापडणार नाही कधीच
अशा ठिकाणी लपवून ठेवल्यात......

तिची बिंदी, पत्र, फोटो अन सोबत पाहिलेल्या
सिनेमाची तिकिटं.....
असं सारं सारं आता तो क्वचितच बाहेर काढतो,
पण वळीवही थिटा पडेल त्याच्यापुढं
इतका त्या दिवशी रडतो.......

रडून मन हलकं करतो तो
अन भरभर आठवणी आवरून घेतो,
कुणीतरी रडताना बघायच्या आतच
स्वतःला कसाबसा सावरून घेतो.....

एकजण बोलला त्या दिवशी की,
"त्या दूरगावच्या लोकांनी पूर्वी त्याला हसताना पाहिलंय
गप्पा गोष्टी करत
मित्रांसोबत बसतानाही पाहिलंय".....

पूर्वीप्रमाणे तो आता हसत नाही अन
मौन बाळगून आता नेहमीच शांत राहतो,
घरात जोरजोरात टिकटिकणारी घड्याळं
आणि सोबतीला फक्त एकांत राहतो......

का कुणास ठाऊक पण,
या कवितेतील 'तो' मला कित्येकदा
माझ्याचसारखा भासू लागतो,
आरशात जेव्हा बघतो मी स्वतःला
समोर तोच दिसू लागतो.......! 👥

✍तुषार 👥🍁

सोमवार, २० जून, २०१६

बाप......#HappyFathersday

🍁 *ही कविता, घराची काळजी वाहताना कायमच स्वतःची स्वप्न हरवून बसलेल्या अन तरीही कवी लेखकांनी ज्याच्यासाठी नेहमीच कमी लेखणी संपवली अशा प्रत्येक  'बापासाठी'*.....

✍🏻 *वसुदेवाचा विसर....!*
आई बापाची गोष्ट सांगताना
थोडं चुकीचंच घडलं
बापाच्या तुलनेत आईच्या पारड्यात
नेहमीच जास्तीचं पडलं.....⚖


चूक आपली नाहीच त्यात कारण

आपल्याला नेहमी आईचेच अश्रू दिसलेत
पण त्या अश्रूंचा हिशोबच कुठंय ?
जे बापानं आडोशाला जाऊन पुसलेत.....


शांत कठोर रागावणारा अन

मारणारा बाप प्रत्येकानं पाहिला
पण त्याच्या हृदयाचा हळवा कोपरा
कायम अंधारातच राहिला......



आपल्यातच सारी स्वप्न बघतोय बाप

जी त्यानं कधी पाहिलीय,
पोरांचं आयुष्य घडवण्यातच त्यानं
पूरी जिंदगी वाहिलीय.......


नशिबानं दिलेले चटक्यांमुळं आयुष्यभर

बाप कधी हसलाच नाही,
आईच्या पायांच्या भेगांआडून बापाचा 
फाटका सदरा कुणाला दिसलाच नाही.....


तिची थोरवी गाताना कायम

नकळत एक गुन्हा घडलाय,
देवकी यशोदेच्या प्रेमापुढं
वसुदेवाचा साऱ्यांनाच विसर पडलाय..........😥


✍🏻-तुषार वाजे 🍁

#HAPPYFATHERSDAY
#LuvUdada