रविवार, १० जुलै, २०१६

माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓.....

(सन 2015 च्या पहिल्या दिवशी कॉलेजच्या कविता संग्रहासाठी लिहिलेली हि कविता......)

🌹🍁माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓....

कॅलेंडरची बारा पानं बघता बघता संपून गेली🗓
कडू-गोड भूतकाळाची आठवण मात्र ठेऊन गेली.....!

मंगळावरच्या झेपेनं छाती सर्वांची फुलली होती,
आसाम पेशावरच्या हल्ल्यांनी काजळकाठ भिजली होती....!

खून दहशत बलात्काराची गर्द छाया पडली होती,
डोळ्यांचं तर सोडाच मित्रांनो, प्रत्येक पापणी सुद्धा रडली होती.....!

पण जुन्या दुःखाना आता किती उगाळत बसायचं
उलटून गेल्या काळावरती किती दिवस रुसायचं....!

पुढ्यात ठाकलेल्या वर्षासाठी चला नवे संकल्प करू
स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आयुष्यात नवे रंग भरू.....!

स्वप्न आणि आकांक्षांचे लावून नवे पंख,
झटकून टाकूया आयुष्यातल्या निराशेचे डंख....

मंद झालेल्या पणतीसाठी लख्ख नवी वात बनू,
विंदांच्या कवितेमधल्या देणाऱ्याचे हात बनू.....!

लहान मोठ्यांना सामावून घेणारी पुण्यशील जागा बनू,
उसवली मनं जोडणारा आपुलकीचा धागा बनू.....!

तुझं माझं विसरायला लावणारी ऐक्याची प्रीत बनू,
'माणूस' म्हणून जगायचं शिकवील असं 'माणूसकीचं गीत' बनू......!

(पुढ्यात ठाकलेल्या नववर्षाचं चला करूया सोनं, कारण
समोर आलंय एक नवीन कॅलेंडर अन त्याची बारा पानं......)

©✍तुषार वाजे....🍁
दि. 1 जानेवारी 2015.....
http://www.tusharwaje91.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा