शनिवार, ९ जुलै, २०१६

आरसा......'तो' आणि 'मी'......

🍁आरसा....👥

तिच्यापासून वेगळं झालेल्या त्यानं
आता स्वतःला थोडंस सावरलंय,
डोळ्यांतून निरंतर वाहणारं पाणी
त्यानं कसंबसं आवरलंय.......

आता तो पहिल्यासारखं 
तासनतास रडत नाही....
एकट्यानं कसं जगायचं ? हा प्रश्न
रोजरोज त्याला पडत नाही.....

कोणी म्हणतं ती सोडून गेली त्याला
तर कोणी म्हणतो त्यानंच तिला सोडलं,
पण एकदा मला बोलला होता तो गहिवरून,
"आमचं ना त्या विधात्यानेच मोडलं !"......💔

तिच्या कित्येक आठवणी त्यानं
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवल्यात,
कुणालाही सापडणार नाही कधीच
अशा ठिकाणी लपवून ठेवल्यात......

तिची बिंदी, पत्र, फोटो अन सोबत पाहिलेल्या
सिनेमाची तिकिटं.....
असं सारं सारं आता तो क्वचितच बाहेर काढतो,
पण वळीवही थिटा पडेल त्याच्यापुढं
इतका त्या दिवशी रडतो.......

रडून मन हलकं करतो तो
अन भरभर आठवणी आवरून घेतो,
कुणीतरी रडताना बघायच्या आतच
स्वतःला कसाबसा सावरून घेतो.....

एकजण बोलला त्या दिवशी की,
"त्या दूरगावच्या लोकांनी पूर्वी त्याला हसताना पाहिलंय
गप्पा गोष्टी करत
मित्रांसोबत बसतानाही पाहिलंय".....

पूर्वीप्रमाणे तो आता हसत नाही अन
मौन बाळगून आता नेहमीच शांत राहतो,
घरात जोरजोरात टिकटिकणारी घड्याळं
आणि सोबतीला फक्त एकांत राहतो......

का कुणास ठाऊक पण,
या कवितेतील 'तो' मला कित्येकदा
माझ्याचसारखा भासू लागतो,
आरशात जेव्हा बघतो मी स्वतःला
समोर तोच दिसू लागतो.......! 👥

✍तुषार 👥🍁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा