शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

पैशाची गोष्ट....

....माणसांना  वापरून पैसे कमविण्यापेक्षा पैसा वापरू अन माणसे जोडुयात ना....!

         सन 1996-97 असेल. म्हणजे अगदी बालवाडीत किंवा पहिली दुसरीत असण्याचा काळ तो. आजच्या सारखं कुरकुरे, जेम्स, किंडर जॉय वा कॅडबरी (आम्ही कॅडबरी हे 'विशेषनाम' म्हणून न वापरता 'सामान्यनाम' म्हणूनच वापरतो....सर्व मोठी व लांब चॉकलेट्स आमच्यासाठी कॅडबरीच....असो ) असलं काही मिळत नव्हतं. त्यातलं काही मिळत असेलही पण ते कधी आमच्या आयुष्यात डोकावलंही नव्हतं कधीच.
       म्हणतात की 90च्या दशकात जन्मलेली मुलं भाग्यवान आहेत खूप. कारण त्यांनी जुनं जगही अनुभवलं अन नवं बदलणारं जगही अनुभवताय. त्या भाग्यवंतांपैकी मी एक.

       विसेक वर्षांपूर्वीचा काळ तो. तेव्हा अगदी 5-10 पैशात दोन मुठीभारून खोबऱ्या गोळ्या मिळायच्या. अन चार आण्यात तर खिसेभरून....!
      अगदी लख्ख आठवतंय... घरातून 10-20 पैशे मिळाले की आमचा आनंद गगनात मावत नसे. आजी आजोबा हे तर आपली लहानपणीची RBIच होते. हे असे गोळ्या बिस्किटांना 10-20 पैसे मागण्यासाठी ते सर्वात हक्काचे.
    आलेले पाहुणे सुद्धा जाताना आजच्यासारखे शंभराची नोट नव्हते देत हातावर. खिशात हात घालून 10-20 पैसे अन फार फार तर चार आणे आठ आणे हातावर टेकवत. पण तेवढ्या पैशाचा केवढा मोठ्ठा आनंद होत असे काय सांगू... मग आमची स्वारी मित्र गोळा करून उड्या मारत मारत सिकंदर शेठच्या दुकानात निघायची. तेव्हा 5-10 किंवा 20 पैसेे तेवढ्या एकाच दुकानात घेत असे. तेवढ्या 10-20 पैशात आम्ही खिसेभरून खोबऱ्या गोळ्या, आस्मानताराच्या गोळ्या किंवा खारे बिस्किटं घेऊन येत. हल्ली तसल्या गोळ्या कुठं मिळतच नाहीत अन मिळाल्या एखाद्या जुन्या टपरीवर तर एका रुपयांमध्ये 5-6 गोळ्या मिळतात....


     खरंच मंतरलेले दिवस होते ते. काळ जसजसा पुढे सरकत गेला त्या पैशांचे मूल्य सरत गेले. (...नंतर RBI नं 1997 मध्ये 5 पैसे, 10 पैसे अन 20 पैसे चलनातून बाद केले. 25 पैसेही अलीकडेच म्हणजे 2011 मध्ये बाद केले. 50 पैसे अजूनही चलनात आहे ही गोष्ट बहुतांशी लोकांना माहीत नसावी. कुणीच ते व्यवहारात स्वीकारत नाहीत ही बाब निराळी.)

      मला कधी कधी खरंच हेवा वाटतो स्वतःचा.... आमच्यासारखं बालपण हल्ली कुणालाच नाही मिळत. आम्ही बालपण 'जगलो'....आज लहानग्यांना बालपण फक्त भेटतं , ते 'जगता' येत नाही.

       तर आज हे सारं पैसा पुराण आठवण्याचं कारण म्हणजे आज 30 नोव्हेंबर 2017 . बरोबर 100 वर्षांपूर्वी म्हणजे 30 नोव्हेंबर 1917 रोजी भारतात पहिल्यांदा 1 रुपयाची नोट चलनात आणली गेली. तेव्हा ती इंग्लडमधून छापून यायची. त्यावर किंग जॉर्ज पाचवा याचे चित्र असायचे. तशा नोटा भारतात 1961पासूनच छापत असत. परंतु नंतर असं झालं की, 1916-17 ला म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या काळात तेव्हाचे 1 रुपयांचे नाणे जे की चांदीचे असे ते वितळवून युध्द साहित्य बनवायला वापर होऊ लागला. ही बाब लक्षात येताच सरकारने ते नाणे बंद करून 1 रुपयाची नोट प्रथमतः चलनात आणली.
तेव्हाची थोडी आकडेवारी लक्षात घेतली तर डोळे विस्फारले जातात. तेव्हाचे 1 रुपयाचे नाणे हे चक्क 10.7 gms चांदीच्या बरोबर होते. म्हणजे त्याची आजचे मूल्य बघितले तर आज 10gms चांदीचा बाजारभाव 400 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 100 वर्षात रुपयाचे मूल्य 400 पट कमी झाले. आजी सांगायची की आमच्या काळात रुपया गाडीच्या चाकाएवढा होता. तेव्हा हसू यायचं त्या वाक्याचं. हल्ली उलगडू लागलाय अर्थ त्याचा.
      ह्या 1 रुपयाच्या नोटा भेटायला आज दुर्मिळ जरी असल्या तरी आजही चलनात आहेत...भेटतात त्या....(माझ्याकडेही तीन आहे बरं का ....! 😉)
      ऑनलाईन भेटलेल्या माहितीनुसार 1 रुपयाच्या 100 नोटांच्या बंडलची किंमत सन उत्सवाच्या काळात 15 हजार रुपये असते. (म्हणजे माझ्याकडं ह्या हिशोबाने 4500 रुपये आहेत राव 😊  )

             असो...पैसा येतो...जातो....पैशाचे मूल्य वाढते.... कमी होते.....पण आजच्या काळात काय झालंय ना, पैसा कमविण्यालाच अधिक महत्व आलंय.
    वपु काळे म्हणतात की , " बेदम पैसा मिळवणं ह्याच्याइतकं मिडीऑकर ध्येय दुसरं असू शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं..."
म्हणून मी काय म्हणतो, आपण पण माणसांना वापरून पैसे कमविण्यापेक्षा पैसा वापरू अन माणसे जोडुयात ना.....! 

✍ तुषार वाजे (नाशिक) 
☎ 9273572706

#पैशाची_गोष्ट #रुपयाच्या_नोटेची_शंभर_वर्ष #जाणिवांचा_दुष्काळ #माणूसपण_हरवतं_तेव्हा....