बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

#15Bikes_32मित्र_अन_एक_भन्नाट_दिवस..#G2G

#Get_Together #G2G #12th_Science_Batch_2007_2009
#15Bikes_32मित्र_अन_एक_भन्नाट_दिवस
आज खूप वर्षांनी साऱ्या
जुन्या यारांची भेट झाली
Whatsapp वर नव्हे fb वर नव्हे
गळाभेट घेत थेट झाली.....✍🏻

       काही दिवसांपूर्वीची गोष्ट.... Whatsapp वरील 12th च्या मित्रांच्या ग्रुपवर एका मित्राची एक पोस्ट येऊन पडते...... "Get Together करायचं का रे ?" बघता बघता हो-नाही हो-नाही रिप्लाय मिळू लागतात... काही मित्र पुढाकार घेतात....सारं सारं जुळून येतं.... तारीख ठरते...ठिकाण ठरतं....अन शेवटी तो भेटीचा भन्नाट दिवस उजाडतो.... एक एक मित्र आपल्या bikeवर जिथं कॉलेज केलं तिथं जमू लागतो....बघता बघता 15-20 Bike अन 30-35 मित्र कधी जमतात कळतही नाही....... प्रत्येक जण एकमेकांना मिठी मारतो....जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.....त्या जवळ जवळ 7 ते 8 वर्षांनी .....!!!!

दिनांक 02 Nov 2016...ठिकाण-टाकेद.... 
सन 2007-2009 च्या 12th Science च्या batch चं Get Together(G2G)....खरंच काय भन्नाट दिवस होता...अविस्मरणीय !
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ज्यांना वेळ मिळाला (काहींना मिळाला नाही तर काहींनी मुद्दाम काढला नाही...त्यांच्या बद्दल राग मुळीच नाही पण एका अवर्णनीय आनंदाला ते मुकले याबद्दल त्यांची कीव येते इतकंच !)
असे 30-35 मित्र भेटलो. काही सोंगणी सोडून तर काही मेडिकल बंद करून, काही पोलीस मित्र रात्रीची duty करून तर Army वाला सुट्टी घेऊन....तर काही आपापल्या अनेक व्यग्र कामातून वेळ काढून जमले होते.
अनेक जण ओळखायलाही येत नव्हते इतके वेगळे दिसू लागलेय. काही जसेच्या तसे दिसतायत. ज्यांना कॉलेजात मिशीही नव्हती ते दाढी मिशी ठेवू लागलेत. काळासोबत काहींचे केस विरळ होऊ लागलेत तर काहींचे पांढरे... पण सार सारं अगदी पहिल्यासारखं वाटत होतं.
टाकेद मध्ये भेटून सर्व गाड्या वळल्या आम्हा सर्व मित्रांची भेट घडवून आणणाऱ्या आमच्या कॉलेजकडे ....।
     सर्व जणांनी तिथं कॉलेजच्या इमारतींसमोर ग्रुप फोटो काढले..अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.... सर्व  शिक्षकांच्या आठवणी आल्या...
सन-2007-2009 12वी (विज्ञान) मित्रपरिवार....

       कॉलेजातून काही मित्रांना रजा देऊन उरलेल्या #12Bike_अन_24मित्रांची स्वारी निघाली थेट #रंधा_Fall इथं ..... Bike प्रवासात इतका आनंद असतो हे प्रथमताच अनुभवलं... रंधा फॉलला जाऊन सर्वांनी अनेक आठवणींना फोटोत कैद केलं. घरून आणलेला दिवाळीचा फराळ खाल्ला.... तिथंच 4PM झाले. तिथं अजून काही मित्रांनी रजा घेतली...
तिथून उरलेल्या #9Bike_अन_18मित्रांची स्वारी वळली भंडारदऱ्याच्या दिशेनं(एका मित्राची bike पंक्चर झाल्यानं तो अन सोबतचे 2 जण पुढं येऊ शकले नाही...) ..... तिथं पोहोचल्यावर 4-5kg चिकन🐔 घेऊन एका हॉटेलात शिजवायला दिलं. जेवण तयार होईपर्यंत मग तिथंच डॅम शेजारी सारे मित्र गोल करून बसले अन बरसू लागला गप्पांचा पाऊस...!
गप्पांचा पाऊस.....

        गप्पांचा विषय ठरलेला ! प्रत्येकानं 12वी नंतरचा 7-8 वर्षाचा प्रवास सांगायचा....अन सोबतच आजवरचे आपापले क्रश किती? अन इथं न सांगता येणाऱ्या एका आपुलकीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठरलं..... 
     सर्वजण इतरांचे अनुभव कथन ऐकून कधी हसत हसत लोटपोट होत होते....तर कधी मित्रांच्या कहाण्या ऐकून उर भरून येत होता..... अनेक जण इंजिनीअर झालेत..अनेक घरचा किंवा नवीन व्यवसाय करताय....कोणी शिक्षक झालंय तर कोणी तलाठी..... कोणी पोलिसात तर कोणी आर्मी मध्ये गेलंय. काही जण डॉक्टर झाले कोणी स्वतःचं मेडिकल सुरु केलं तर काही जण स्पर्धा परीक्षेत आपलं नशीब आजमावताय(त्यात आम्ही पण) ....! खरंच , सर्व मित्र खऱ्या अर्थाने मोठे झाले होते !
   गप्पांच्या ओघात कधी सायंकाळचे 7 वाजले ते कळलंच नाही. तोपर्यंत चिकन शिजलं होतं. सर्वांना प्रचंड भूकही लागली होती.... सर्वांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारला...(नॉनव्हेज न खाणारी 4 पोरं उपाशी मेली राव.... नॉनव्हेज बरं असतं असं पहिल्यांदा वाटलं लाईफमध्ये तसंच जेवण अन ते हॉटेल कुणीच आयुष्यभर विसरणार नाही बरं का ....) 
जेवून निघायला 8.45Pm झाले .... सर्व Bike पुन्हा शेवटी चहा/कॉफी/Sprite घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या..... वासाळी घाट आल्यावर सर्व bike पुन्हा थांबल्या कारण तिथून अनेक गाड्यांचा मार्ग बदलणार होता......
  रात्रीच्या 9.15 वाजता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घाटातच चालू झाला.... तो खालीलप्रमाणे..
-सर्वप्रथम G2G चं आयोजन केल्याबद्दल महेश (बुंट्या) चे आभार....प्रचंड टाळ्या 😃
-आयोजनाला हातभार लावल्याबद्दल पाटलाचे(स्वयंघोषित आमदार) आभार...टाळ्या अन हशा 😝
-दिवाळीचा फराळ खाऊ घातल्याबद्दल माझे(तुषार) आभार.....टाळ्या....!
-21MP कॅमेरासाठी CM साहेबांचे आभार....आता जरा जोराच्या टाळ्या !!
-सोबत एकमेव असलेलं शिरस्त्राण(हेल्मेट) पूर्ण प्रवासभर परिधान केल्याबद्दल(पोलीस ही नियम पाळतात बरं का !😁) अर्जुन(म.पोलीस)चे आभार.....
-अंकुशने दिलेल्या पुंगळ्यांसाठी अंकुशचे आभार...प्रचंड टाळ्या 
-अन अर्जुनने खाऊ घातलेल्या केळींसाठीही त्याचे आभार......टाळ्या 
-G2G साठी पोलीस protection पुरवल्याबद्दल अर्जुन(म.पोलीस) चे पुनःश्च  आभार...टाळ्या....
-केंद्राकडून G2G साठी आर्मी protection ही मिळाले त्यासाठी सोमेश(Indian Army) चे आभार...टाळ्या 
  अन शेवटी सर्वांनी आल्याबद्दल एकमेकांचे आभार मानत अन कितीही मोठं झालं तरी पाय जमिनीवर राहू देण्याचं वचन देत अन पुन्हा काही वर्षांनी नक्की भेटू असा शब्द दिला तोवर  रात्रीचे 9.30 झाले होतेे.... सर्वांच्या गळाभेटी घेत शेवटी Bike Start केल्या..... काही मिनिटांत माझा खेड चा Stop आला....माझी Bike डावीकडे वळली.... मी सर्वांना हॉर्न दिला....त्यांनीही मला हॉर्न दिला...अन सर्व गाड्या पुढे निघून गेल्या.....जसे पक्षी परततात आपापल्या घरट्याकडं अगदी तशाच...
   आता मागे उरले होते ते त्यांच्या गाड्यांचे दुरून दिसणारे अंधुक दिवे....अन...आयुष्यभर पुरतील अशा भन्नाट भेटीच्या आठवणी....!

✍🏻#तुषार_वाजे
03 नोव्हेंबर 2016

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

📚शिक्षक दिन...📖 ०५ सप्टेंबर २०१६....🎓✍🏻

📚शिक्षक दिन .....🎓✍🏻
       आजवरच्या माझ्या जीवनप्रवासात अनेक गुरुवर्य लाभले. प्रथम लाभले माझे आई-बाबा. त्यानंतर शालेय जीवनातले गुरुजी-बाई (गुरुजींचे धोतर-टोपी अन बाईंनी दिलेला धपाटा अजूनही चांगलाच ध्यानात आहे 😃). काही व्यावसायिक अभ्यासक्रमातले तर काही महाविद्यालयातले. काही जीवनप्रवासात कायम साथ दिलेले माझे प्रिय मित्र-मैत्रिण तर कधी कधी गाडीच्या प्रवासात अल्प काळासाठी भेटलेले पण आयुष्यभर पुरेल अशी शिकवण देऊन गेलेले सहप्रवासीही.....!👫👬
           आई-बाबा, गुरुवर्य ह्या साऱ्यांनी जीवन जगायला आणि उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवलं. काहींनी लिहिलेलं वाचायला शिकवलं तर काहींनी माणसं वाचायला. काहींनी मैत्रीतलं प्रेम शिकवलं तर काहींनी प्रेमातील मैत्री. काही गुरूवर्यांनी आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून कसं घायचं हे शिकवलं तर काहींनी दुसऱ्याच्या दुःखात आपण सामील कसं व्हायचं ह्याची शिकवण दिली.
अनेक जणांनी हसायला शिकवलं तर काही रडायचं शिकवून गेले. एकाच माणसाचे अनेक चेहरे काही जण दाखवून गेले. 
         अनेक कवी-लेखकांनीही जीवन समृद्ध केलं. जीवनात रसिकता भरली. त्यापैकी खासकरून व.पु.काळे आणि पु.ल.देशपांडे ह्यांचे नाव अग्रक्रमी येईल. वपुंनी 'माणूस शोधायला' शिकवलं तर पुलंनी हसवता हसवता थेट भावनांना हात घातला......!
      काही गुरुवर्य अंतराने कितीही दूर असले तरी त्यांचा आशिर्वाद, शुभेच्छा कायमच सोबत आहेत. त्यांनीच जगण्याला खरी दिशा दिली. जगण्याला बळ दिलं.
        काही शिक्षक का कुणास ठाऊक पण 'कायम अप्रिय' ह्या श्रेणीतील होते/आहेत, याचीही प्रांजळपणे कबुली देतो. त्यांनीही जीवनाचे अनेक पाठ शिकवले. 
          अशा माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात भेटलेल्या माझ्या सर्व गुरुजनांना आजच्या या *शिक्षक दिनाच्या शतकोटी शुभेच्छा !*
(काही शत्रूही झाले ह्या प्रवासात. ज्यांनी आयुष्यभर पुरेल अशी मोलाची शिकवण दिली. त्यांनाही शुभेच्छा !💐)

सर्वांसाठी ह्या चार ओळी,
"भरकटलेली नौका आमची
गुरुजी तुम्हीच किनारी नेली,
ओबडधोबड दगड होतो
तुम्हीच सुंदर मूर्ती केली.....!"


✍©तुषार वाजे, खेड,ता.इगतपुरी,नाशिक.
दि.०५ सप्टेंबर २०१६(गणेश चतुर्थी)


रविवार, १० जुलै, २०१६

माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓.....

(सन 2015 च्या पहिल्या दिवशी कॉलेजच्या कविता संग्रहासाठी लिहिलेली हि कविता......)

🌹🍁माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓....

कॅलेंडरची बारा पानं बघता बघता संपून गेली🗓
कडू-गोड भूतकाळाची आठवण मात्र ठेऊन गेली.....!

मंगळावरच्या झेपेनं छाती सर्वांची फुलली होती,
आसाम पेशावरच्या हल्ल्यांनी काजळकाठ भिजली होती....!

खून दहशत बलात्काराची गर्द छाया पडली होती,
डोळ्यांचं तर सोडाच मित्रांनो, प्रत्येक पापणी सुद्धा रडली होती.....!

पण जुन्या दुःखाना आता किती उगाळत बसायचं
उलटून गेल्या काळावरती किती दिवस रुसायचं....!

पुढ्यात ठाकलेल्या वर्षासाठी चला नवे संकल्प करू
स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आयुष्यात नवे रंग भरू.....!

स्वप्न आणि आकांक्षांचे लावून नवे पंख,
झटकून टाकूया आयुष्यातल्या निराशेचे डंख....

मंद झालेल्या पणतीसाठी लख्ख नवी वात बनू,
विंदांच्या कवितेमधल्या देणाऱ्याचे हात बनू.....!

लहान मोठ्यांना सामावून घेणारी पुण्यशील जागा बनू,
उसवली मनं जोडणारा आपुलकीचा धागा बनू.....!

तुझं माझं विसरायला लावणारी ऐक्याची प्रीत बनू,
'माणूस' म्हणून जगायचं शिकवील असं 'माणूसकीचं गीत' बनू......!

(पुढ्यात ठाकलेल्या नववर्षाचं चला करूया सोनं, कारण
समोर आलंय एक नवीन कॅलेंडर अन त्याची बारा पानं......)

©✍तुषार वाजे....🍁
दि. 1 जानेवारी 2015.....
http://www.tusharwaje91.blogspot.com

शनिवार, ९ जुलै, २०१६

आरसा......'तो' आणि 'मी'......

🍁आरसा....👥

तिच्यापासून वेगळं झालेल्या त्यानं
आता स्वतःला थोडंस सावरलंय,
डोळ्यांतून निरंतर वाहणारं पाणी
त्यानं कसंबसं आवरलंय.......

आता तो पहिल्यासारखं 
तासनतास रडत नाही....
एकट्यानं कसं जगायचं ? हा प्रश्न
रोजरोज त्याला पडत नाही.....

कोणी म्हणतं ती सोडून गेली त्याला
तर कोणी म्हणतो त्यानंच तिला सोडलं,
पण एकदा मला बोलला होता तो गहिवरून,
"आमचं ना त्या विधात्यानेच मोडलं !"......💔

तिच्या कित्येक आठवणी त्यानं
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवल्यात,
कुणालाही सापडणार नाही कधीच
अशा ठिकाणी लपवून ठेवल्यात......

तिची बिंदी, पत्र, फोटो अन सोबत पाहिलेल्या
सिनेमाची तिकिटं.....
असं सारं सारं आता तो क्वचितच बाहेर काढतो,
पण वळीवही थिटा पडेल त्याच्यापुढं
इतका त्या दिवशी रडतो.......

रडून मन हलकं करतो तो
अन भरभर आठवणी आवरून घेतो,
कुणीतरी रडताना बघायच्या आतच
स्वतःला कसाबसा सावरून घेतो.....

एकजण बोलला त्या दिवशी की,
"त्या दूरगावच्या लोकांनी पूर्वी त्याला हसताना पाहिलंय
गप्पा गोष्टी करत
मित्रांसोबत बसतानाही पाहिलंय".....

पूर्वीप्रमाणे तो आता हसत नाही अन
मौन बाळगून आता नेहमीच शांत राहतो,
घरात जोरजोरात टिकटिकणारी घड्याळं
आणि सोबतीला फक्त एकांत राहतो......

का कुणास ठाऊक पण,
या कवितेतील 'तो' मला कित्येकदा
माझ्याचसारखा भासू लागतो,
आरशात जेव्हा बघतो मी स्वतःला
समोर तोच दिसू लागतो.......! 👥

✍तुषार 👥🍁

सोमवार, २० जून, २०१६

बाप......#HappyFathersday

🍁 *ही कविता, घराची काळजी वाहताना कायमच स्वतःची स्वप्न हरवून बसलेल्या अन तरीही कवी लेखकांनी ज्याच्यासाठी नेहमीच कमी लेखणी संपवली अशा प्रत्येक  'बापासाठी'*.....

✍🏻 *वसुदेवाचा विसर....!*
आई बापाची गोष्ट सांगताना
थोडं चुकीचंच घडलं
बापाच्या तुलनेत आईच्या पारड्यात
नेहमीच जास्तीचं पडलं.....⚖


चूक आपली नाहीच त्यात कारण

आपल्याला नेहमी आईचेच अश्रू दिसलेत
पण त्या अश्रूंचा हिशोबच कुठंय ?
जे बापानं आडोशाला जाऊन पुसलेत.....


शांत कठोर रागावणारा अन

मारणारा बाप प्रत्येकानं पाहिला
पण त्याच्या हृदयाचा हळवा कोपरा
कायम अंधारातच राहिला......



आपल्यातच सारी स्वप्न बघतोय बाप

जी त्यानं कधी पाहिलीय,
पोरांचं आयुष्य घडवण्यातच त्यानं
पूरी जिंदगी वाहिलीय.......


नशिबानं दिलेले चटक्यांमुळं आयुष्यभर

बाप कधी हसलाच नाही,
आईच्या पायांच्या भेगांआडून बापाचा 
फाटका सदरा कुणाला दिसलाच नाही.....


तिची थोरवी गाताना कायम

नकळत एक गुन्हा घडलाय,
देवकी यशोदेच्या प्रेमापुढं
वसुदेवाचा साऱ्यांनाच विसर पडलाय..........😥


✍🏻-तुषार वाजे 🍁

#HAPPYFATHERSDAY
#LuvUdada

रविवार, ५ जून, २०१६

🌳एक वृक्ष की पुकार 🌲

🍁🌴जागतिक पर्यावरण दिन की शुभकामनाएं 🌳🌲

तेज़ धुप से बचकर मै एक 
वृक्ष के नीचे सो रहा था,
नींद उडी जब सुना स्वयं एक
वृक्ष वही पर रो रहा था......।🌳😥

पूछा मैंने हैरानी से 
क्या हुआ? क्यों रो रहे हो ?
"अकेला हो रहा वृक्ष यह जिसके*
छाँव मे तुम सो रहे हो....।"

बरसो बीते इस बात को
जब जग भी सारा हरा-भरा था....🌾🌳🌷
खिलखिलाती थी सारी दुनिया 
नाम उसका *वसुंधरा* था....।🌏

काँट दिए वह भी वृक्ष जिसपर 
घर बसते थे परिंदों के.....🕊
हात न काँपे किंचित भी उसवक्त
जालिम उन दरिंदो के.... ।👺

ऊष्मा प्रचण्ड बढ़े तेज़ी से🔥
रास्तो को यंत्र से भर दिया ...🏎🏍🚍🚕🚗
साँसों को नहीं रही स्वच्छ हवा
गंगा को भी मैला कर दिया ....।

कर दिया सबने कलुषित धरा को
अब न आते वसंत बहार
सोच तू दिल से जित नही तेरी
यह तो मानवजाति का संहार .....😱

क़ुदरत का कानून हैं यह
न बदला था न बदल सकेगा ...
हात में तेरी मौत का तांडव 
रोक ले पगले बाद न रुकेगा....।

चिल्लाने का वक्त बिता अब
समय न गवां तू स्याही में ,✍🏻📰
शीघ्र कृति कर अब ना रुक तू
दो पेड़ लगा दे अमराई मे.....।🌳🌳
5 जून 2016
✍🏻 *तुषार वाजे (काव्यांजली)
#WorldEnvironmentDay
#www.tusharwaje91.blogspot.com


मंगळवार, १७ मे, २०१६

🎨आठवणींची पेटी......📓

काल अडगळीच्या खोलीमधली 
आठवणींची पेटी चाळत होतो,
एकेक दिवस आठवून जुना
नकळत टिपं गाळत होतो.....

फुटलेली पाटी अन पेन्सिलचे तुकडे
सारं सारं त्यात भेटलं
पुन्हा एकदा लहान होऊन 
शाळेत जाऊन बसावसं वाटलं......

त्यातच होती गृहपाठाची
जीर्ण झालेली माझी वही,
बहुतेकदा मिळालेला 'उत्तम' शेरा
अन तारखेसह गुरुजींची सही......

एका गणिताच्या वहीमध्ये तर
चुका सतराशे साठ होत्या,
पण मराठीच्या पुस्तकातील कविता मात्र
अजूनही मला तोंडपाठ होत्या......


वहीच्या शेवटच्या पानांवर तर
रेघोट्यांचा थवा उतरला होता
लहानपणीचा काळच जणू
त्या पानांवर चितारला होता....

गुरुजींचा धपाटा बाईंची छडी 
सारं काही आठवत होतं
मागं सोडून आल्या दिवसात 
मला पुन्हा एकदा पाठवत होतं.....

चिंचा बोरं खोबऱ्याच्या गोळ्या
मुद्दाम काढलेल्या पोरींच्या खोड्या,
छत्री असतानाही पावसात भिजणं
अन पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या....

बघता बघता आजूबाजूला जणू
पोरांचा घोळका जमू लागला,
'बे एके बे' चा मोठ्ठा आवाज
चोहीकडे माझ्या घुमू लागला....

पेटीमधली प्रत्येक  गोष्ट
आयुष्य माझं सजवून गेली....
दिप्या, पक्या, नित्याची आठवण
डोळे चिंब भिजवून गेली......😓

✍काव्यांजली

हजारो आठवणी राहून गेल्यात....

केव्हाची वाट पाहिली होती या दिवसाची,
पुढची स्वप्नं रंगवून ठेवली होती केव्हाची.
खुप उतावीळ होतो येथून जाण्यासाठी,
आयुष्याचे पुढचे वळण घेण्यासाठी.

पण का कोण जाणे ह्रदय आज दाटतंय,
वेळेला थांबवावसं सारखं वाटतंय.
का कोण जाणे आज काहीतरी खुपतंय,
असे का वाटतं की काहीतरी चुकतंय...?
म्हणायचो की खुप कठीण ही २ वर्षे जगुन गेलोय...,
पण आज वाटतंय काहीतरी नक्कीच मागे विसरुन गेलोय.....!
ज्ञात-अज्ञात अशा अनेक गोष्टी राहून गेल्या,
न विसरता येणा~या हजारो आठवणी राहून गेल्या.


आता पाठीमागून गुपचुप येऊन डोक्यात टपली कोण मारील,
माझं डोकं खाण्यासाठी कोण माझा पीछा करील?
उद्या जिथे २-२ हजारांचा हिशोब नसेल,
तिथे २-२ रुपयांसाठी कोण भांडण करीन,
रात्रभर जागुन आता दंगामस्ती कोण करीन?
कोण एकमेकांचा डबा न विचारता खाईल,
कोण आता मला नव्या नव्या नावाने हाक देईल?



मी आता विनाकारण कुणाशी भांडण करु, विना टाँपिक बकवास कुणासोबत करु?
कोण आता कमी मार्क पडल्यावर धीर देईन, कोण चुकून नंबर आल्यावर शिव्या देईन?
नवनवीन ठिकाणं आता कुणासोबत बघु,
रम्य ते जीवन एकटा कसा जगु.
खरंच असे मित्र कुठे मिळतील जे दरीत धक्का देतील, अन् वाचवायला स्वत:ही उडी घेतील.


माझे टाँट ऐकून त्रासून कोण जाईल,
कधी मला शांत बघुन हैरान कोण होईल?
कोण म्हणेल की तुषार तुझ्या जोकवर हसायला नाही येत, कोण म्हणेल मित्रा तुझ्याशिवाय कोण साथ नाही देत.
दंगामस्तीचा खेळ आता कुणासोबत खेळेन, कुणासोबत आता कंटाळवाणे लेक्चर झेलेन?
सरांच्या PJ वर पाठीमागून राक्षसासारखा कोण हसेल,
हारणा-याकडनं पार्टी अशा पैजेत आता कोण फसेल...?
माझ्या सर्टीफीकेट्सला रद्दी म्हणण्याची हिम्मत कोण करेल,
माझ्यासाठी खरा सल्ला देण्याचं धाडस कोण करेल.....?


डेस्कवर आता मी कुणासोबत जाईल, ज्युनियर्सला फालतूचे सल्ले कसे देईल?
अचानक.... विनाकारण.... कुणालाही पाहून वेड्यासारखं हसणं कुणास ठाउक कधी होईल,
एकदा तरी म्हणा ना दोस्तांनो पुन्हा सारं होईल....!
मित्रांसाठी सर/ मॅडम शी आता कोण भांडेल,
पुन्हा हसण्या-रडण्याचा डाव कोण मांडेल ?


रात्रीचे २-२ वाजता ढाब्यावर चहा प्यायला कोण जाईल,
आपल्या बेसूर आवाजात खास मित्रांसाठी गाणं कोण गाईल?
कोण मला माझ्या हुशारीचा भरोसा देईल आणि कोण मला हवेत जास्त उडाल्यावर पुन्हा जमीनीवर घेउन येईल?
माझ्या आनंदात खरंच आनंदी कोण होईल, माझ्या दु:खात माझ्यापेक्षा दु:खी कोण होईल....?
माझी ही कविता कोण वाचेल,
कोण तिला खरंच समजेल?


खुप काही लिहायचे बाकी आहे, काही साथ बहुतेक बाकी आहे.
फक्त एकाच गोष्टीची भिती वाटते मित्रांनो, आपण अनोळखी ना बनून जावो मित्रांनो.
जीवनाच्या रंगात मैत्रीचा रंग फिका ना पडून जावो (मित्रांनो),
कधी असे ना होवो की दुस-या नात्याच्या गर्दीत मैत्रीच हरवून जावो (मित्रांनो).
जीवनात पुन्हा भेटण्याचं वचन देत जा,
जर नाहीच कधी भेटता आलं तर आठवण काढत जा.
पाहीजे तेवढे हसून घ्या आज माझ्यावर मी वाईट नाही वाटुन घेणार,
ह्याच हसण्याला ह्रदयात साठवून घेणार, अन् आठवण येईल जेव्हा तुमची तेच हसु थोडसं गालावर येऊ देणार.
...तुषार है मेरा नाम , और ये था मेरे दोस्तो के लिए एक छोटासा पैगाम....


     ✍🏻✍🏻♥♥*तुषार वाजे*♥♥


सोम. दि.०९ जुलै २०१२
वेळ- सायं.०५:३५ मि

🍂स्वप्नांचा पाचोळा🍃


हल्ली रोजच एकाकी जन्म खाऱ्या अश्रूंमध्ये बुडतो आहे,
सोबत पाहिल्या स्वप्नांचा पाचोळा डोळ्यांदेखत उडतो आहे......💔😢

सुखांनी घरकुल सजवायचं होतं
पण अश्रुंचे तोरणच नशिबी आले,
तुझ्या हास्यानं भरलेलं आयुष्य
नजरेसमोर रिते झाले. 
आसवांचे ते तोरण घेऊन एकटाच मी धडपडतो आहे,
सोबत पाहिल्या स्वप्नांचा पाचोळा डोळ्यांदेखत उडतो आहे .......

सर्वत्र थैमान दुष्काळाचं आहे
पण डोळ्यांत कधी तो पडत नाही,
असा एकही क्षण मिळणं कठीण
ज्यात तुझ्या आठवणींत मी रडत नाही......
पण तरीही तुला आठवण्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा घडतो आहे.....
सोबत पाहिल्या स्वप्नांचा पाचोळा डोळ्यांदेखत उडतो आहे .......

आयुष्यात कुठल्या वळणावर जर
कदाचित भेट लिहिली असेल ,
"आनंदात तर आहेस ना ग तु ?" 
प्रश्न ओठांवर एवढाच असेल......
तुझ्या त्या "हो" उत्तरासाठी हा एकाकी जीव तडफडतो आहे......
सोबत पाहिल्या स्वप्नांचा पाचोळा डोळ्यांदेखत उडतो आहे .......

✍ तुषार

16 मे 2016

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

तू एक गुन्हा केलास !

तू एक गुन्हा केलास !
हो तू एक गुन्हा केलास.....!!
सोडून जात होतीस ना तू तेव्हा 💔
एकदाही मागे वळून पाहिले नाहीस......
जाता जाता माझ्या पेटल्या हृदयावर🔥
नयनांतील दोन थेंब वाहिले नाहीस.....

तसच गेलीस निघून तू दूर दूर 
वेड्या हृदयाला जळतं ठेऊन,
जीवन आणि मरणाच्या पेचात
अभाग्याला ह्या लोंबकळतं ठेऊन.....

जाताना तुझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे
हतबल होऊन पाहत होतो,
भरून आल्या डोळ्यांनी शरीरभर
आसवांचा अभिषेक वाहत होतो.....😢😢

खूप खूप वाट पाहिली मी
तुझ्या परतून येण्याची,⌛
रडत माझ्याकडे येऊन मला
तुझ्या मिठीत घेण्याची.....

पण तशीच तू निघून गेलीस,
पेटलेलं हृदय सोबतीला ठेऊन
हातामध्ये या वेड्या प्रेमीच्या
आसवांचे जाम देऊन.....😢🍷

तुझ्या एकदातरी मागे वळून बघण्याने
जळनं हृदयाचं थांबलं असतं,
कंठाशी आलेलं मरण माझं
निदान चार दिवस तरी लांबलं असतं.....

✍तुषार

मंगळवार, २९ मार्च, २०१६

आई बाबाची राजकुमारी तु 👰

एका मैत्रिणीच्या लग्नानिमित्त तिच्यासाठी लिहिलेली हि कविता.......✍🏻

प्रिय ,

तुम्हा दोघांनाही लग्नाच्या खुप खुप खुप शुभेच्छा 🍁

🍁🍁👇🏻👇🏻👇🏻✍🏻✍🏻✍🏻
आई बाबाची राजकुमारी तु 👰🏻
आता राजाची राणी होणार 👸🏻
घर सोडून जातांना तु
डोळ्यांत साऱ्यांच्या पाणी येणार....😥


सनई-चौघड्याचे मंजुळ स्वर
मंडपात साऱ्या घुमू लागतील🎺🎷🎻🎼
अक्षदा टाकायला तुमच्या शिरावर
नातेवाईक आप्तेष्ट जमू लागतील.....






मंगलाष्टके आणि सात फेरे 👣
साताजन्माची वचनं सांगतील,
मंगळसूत्राची पवित्र गुंफण
पतिराज तुझ्या गळ्यात बांधतील......📿


बघता बघता लग्न होईल
नातं नवं जुळून येईल,
'माहेर'चा तुझा पत्ता जाऊन
मुक्काम पोष्ट 'सासर' होईल .....🏡📌


आवडी- निवडी एकमेकांच्या
हळू हळू कळत जातील,
त्याचं सुख तुझं सुख😊
अन तुझे दुःखं त्याचे होतील.....☹

ठसका जेव्हा लागेल तुला
डोळ्यात त्याच्याच पाणी येईल,😥
रुसून अबोला धरशील तेव्हा🤐
ओठांवर त्याच्या गाणी येईल.....🎧


रुसवे फुगवहीे होतील तुमचे
थोड्याच वेळात विसरून जा,
कपामधल्या वादळाला या
चहासोबतच संपवत जा......

पुरुष म्हटल्यावर पसारा आलाच
तुही तेवढं आवरून घे,
तोही हळू हळू शिकेल सारं
त्याला नेहमी सावरुन घे....👍🏻

जेव्हा तुमच्या दोघांमध्ये
कडाक्याचं भांडण होईल
बस एक मिठी पुरेशी ठरेल
राग बघ त्याचा पळून जाईल....

संसार एकाचा नसतोच कधी
तुही कायम सोबत चालत जा,👣
त्याच्या काही चुकांवरही
पदराचं पांघरूण घालत जा.....

अजून काय सांगावं मी,
तुम्ही आनंदी राहावं हीच एक इच्छा,
तुम्हा दोघांनाही लग्नाच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा...लक्ष लक्ष शुभेच्छा !!!

लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा ......💐🎁🍁
MAY GOD BLESS U BOTH .....
WISH U HAPPY MARRIED LIFE .😊😊


✍🏻 तुषार ✍🏻

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

डोळ्यांतला पाऊस ......


                  हल्ली तो लहरी पाऊस खुपच जवळचा वाटतो,

               मेघ भरुन आले नाही तरी डोळ्यांत नेहमी दाटतो....



एकदा अशाच पावसामध्ये तु भेटली होती,
जवळ खेचत तुला मी माझ्या 
मिठीत घेतली होती....



त्याच घट्ट मिठीमध्ये दिलं होतस एक वचन,
विसरणार नाहीस कधीच मला ठेवशील माझी आठवण....

सोबत जगण्या-मरण्याच्या अनेक शपथा दिल्या होत्या...
न विसरता येणाऱ्या अनेक आठवणी दिल्या होत्या....

त्याच दिवसांत स्वप्नांचे कित्येक इमले रचले होते 
सोबत पावसात भिजताना गारांचे खडेही वेचले होते....

पण, तु सोडून जाण्याला आता 
कित्येक दिवस लोटले,
तु गेलीस अन आयुष्यात केवळ अश्रूच मला भेटले....💔

सोबत तु होती ना तेव्हा 
सवय तुझी झाली होती,
इतकं प्रेम दिलस की शेवटी 
व्यसन तु माझं झाली होतीस....

कित्येक पावसाळे बरसून गेलेत आठवणी फक्त राहिल्यात,
तुझ्या मिठीतल्या स्पर्शाच्या जाणिवा फक्त राहिल्यात...

एकटं पावसात भिजण्याची आता हिम्मतच राहिली नाही,
तुझ्याशिवाय या श्वासांनाही 
किम्मत राहिली नाही....

आता भरुन येतात जेव्हा काळे मेघ 
तेव्हा खिडकीत उभा राहतो,
सरीवर सरी कोसळताना 
दुरुनच मी पाहतो....




पावसाच्या त्या सरीँबरोबर
डोळे निरंतर वाहतात,
तुझ्या मिठीची आठवण देऊन
चिंब भिजवत राहतात....!
चिंब भिजवत राहतात.....!!





✒️ ©️कवी : तुषार वाजे

☎️9273572706

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

आई तुझी गाथा .....!!!

(शिक्षणासाठी घरापासून दूर असेलेल्या मुलाने आईची सांगितलेली ही गाथा )
!!!आई तुझी गाथा !!!
आई तुझी गाथा कशी
 सांगू मी जगताला,
आठवून आज  तूला कंठ दाटला, 
आई तुझ्या, आठवणीने आज माझा कंठ दाटला...!

अंगाईची धून तुझ्या गुणगुणते कानात 
बालपणीच्या दिवसांचे काहूर मनात ,
कोरड्या ठन्न डोळ्यांचा ह्या बांध फुटला .......!


लहानपणी अंगामध्ये भरला व्हता ताप 
डोळ्यात वाहे गंगा तुझ्या जागाच सोबती बाप 
आज ठेचाळता पुसतो  मीच रक्ताला ......!

लेकरांच्या सुखासाठी चंदनापरी झिजलीस 
आम्हा देऊनी भाकर तू उपाशी निजलीस 
ऊब तुझ्या मायेची भासता तुझी वाकळ संगतीला ....!

मिणमिणत्या या पणतीला  मशाल केलया
भरकटलेल्या नावेला या किनारी नेलया 
चुकलो जर वाट कधी तुझे शब्द सोबतीला .....!


आठवतो माते तुझा कष्टाळला  घाम 
आई तुला देईन मी सुखाचा आराम ,
लोक सारी सलाम करतील तुझ्या या काठीला ......!


शिकून मी मोठा होईन नाव काढतील लोक 
पायावर माते तुझ्या सुख आणीन कैक 
महाल मी करीन आई आपल्या झोपडीला
पायावर तुझ्या ठेवीन काढून जीवाला ......!
आठवून आज  तूला कंठ दाटला, 
आई तुझ्या, आठवणीने आज माझा कंठ दाटला...!!!!

 ©तुषार वाजे (नाशिक)
संपर्क : 9273572706

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

प्रेम करावं....

*प्रेम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

प्रेम करावं आईच्या पायी पडल्या भेगांवर
पुसट होत चाललेल्या बापाच्या हातावरल्या रेघांवर ....





प्रेम करावं आईच्या जीर्ण झाल्या पदरावर

आयुष्य सांधताना फाटलेल्या बापाच्या त्या सदऱ्यावर  ....



प्रेम करावं बहिणीवर अन प्रेम करावं भावावर
आपलं बालपण बघितलेल्या कौलारू घरांच्या गावावर ....



प्रेम करावं उखळावरती, प्रेम करावं जात्यावर
काळासोबत पुसट होत चालल्या आपुलकीच्या नात्यांवर....




प्रेम करावं आजीच्या पंचतंत्रातील गोष्टींवर 
अन प्रेम करावं आजोबांच्या वाढत्या वय पासष्टीवर .....



प्रेम करावं मायेनं भरवलेल्या वरण आणि भातावर
चेंडू लागून पडलेल्या दुधाच्या त्या दातावर .....



प्रेम करावं लहानपणी काढलेल्या निसर्ग चित्रावर
जीवाला जीव देणाऱ्या सखा यार अन मित्रावर.....



प्रेम करावं शिवबा नावाच्या आपल्या थोर बापावर
सह्याद्रीतून घुमणाऱ्या घोड्याच्या त्या टापांवर ......



प्रेम करावं शाळेवर आणि प्रेम करावं शिक्षकांवर
भूमातेच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या रक्षकांवर....



प्रेम करावं दिव्यावर अन प्रेम करावं वातीवर
कुशीतून सोनं पिकवणाऱ्या त्या काळ्या मातीवर....



प्रेम करावं कवींवरती आणि तितकच गायकांवर
शेजारणीचा नाद सोडून आपल्या आपल्या बायकांवर.....



प्रेम करावं कविता लिहिताना संपणाऱ्या या लेखणीवर
अन कायम कविता सुचावी म्हणून नटणाऱ्या त्या देखणीवर .....



प्रेम करावं चंद्रावर अन प्रेम करावं ताऱ्यांवर
जात-पात- धर्म विसरून प्रेम करावं साऱ्यांवर....
*प्रेम दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा !!!
कवी :तुषार वाजे (नाशिक)