गुरुवार, २ एप्रिल, २०२०

खरंय... नात्यात ब्रेक गरजेचा असतो..


खरंय...
नात्यात ब्रेक गरजेचा असतो...
तू तिथे मी इथे.... 
तुझी कामं वेगळी असतात 
अन माझी कामं वेगळी...
आपल्या कामातून , दिवसांतुन काही क्षण भेटतात...
ते एकमेकांना दिले की मग
दूर असलेली आपल्यातली अंतरे मिटल्यासारखी वाटतात. 
त्यात तू तिथून माझी काळजी करतेस
मी इथून तुला जपण्याचा प्रयत्न करतो. 
तुला मोबाईल नामक खिडकीतून बघत राहतो कित्येक वेळ एकटक....
वेळ थांबवुन ठेवावा वाटतो काही काळ अन बघत रहावं वाटतं तुला मनसोक्त. 
बघता बघता एकमेकांना कधी पाणावतात डोळे.... कधी हसू येतं गालावर....
कधी तिथून तू गायला सुरू करते मग मी बनतो तुझा एकटा उपस्थित असलेला श्रोता. तू गात असतेस जगाची पर्वा न करता मन भरेपर्यंत अन मी बघत असतो तुला गाताना एकटक डोळे भरपर्यंत...❤️
माझे डोळे भरले की विचारतेस तू काय झालं ?
मग माझ्या कपाळावर अशा वेळीच लख्ख दिसणारी शीर बघून समजतात तुला कारणं सारी...
रोज तुझी तब्येत, जेवण, काम सगळ्याची विचारपूस होते. तू खाऊ घालते तिथून मोबाईल च्या स्क्रीनकडे हात नेऊन. मी ही मग भातुकलीच्या खेळासारखं घास खाल्ल्याचे दाखवतो. अंतर दूर असलं की मोबाईल हीच खिडकी आपली वाटू लागते एकमेकांना जवळ आणण्यासाठी.
मी ओरडतो नेहमी तुला तुझ्या आळसावरून... तू मला मी मोबाईल जास्त वापरतो यावर ओरडते...❤️
तुझं शेड्युल चुकलं की माझी चिडचिड होते.... माझाही दिवस वाया गेला की तू ओरडते....
मग सुरू होतात किरकोळ भांडणं आपल्यात....
तुला वाटतं मी माघार घ्यावी मला वाटतं तू चूक मान्य करावी...
शब्दाने शब्द वाढत जातो...
आवाज मोठा होत जातो....
मोठा झालेला हा आवाज आपल्यात आधीच रस्त्याने दूर असलेलं अंतर मनातूनही दूर करू लागतो. तुला तुझं स्वातंत्र्य हरवल्यासारखं वाटतं मला वाटतं जपावे तु माझे काही हक्क....
शेवटी फोन आदळले जातात... मग फोनवर न बोलता आलेलं मनातलं सगळं टेक्स्ट मधून ओकलं जातं... सुरू राहतो हा खेळ काही मिनिटे....
भांडता भांडता तू offline गेलीस की परत माझी चिडचिड होते....
मी उत्तर नीट दिले नाही तर तू रागावतेस....
सुरू राहतो हा खेळ नेहमीच आपल्यात.....कित्येक दिवस झालेत...
मग काही काळ बोलायचं नाही आपण हा निर्णय घेतला जातो....तू म्हणतेस माझी इच्छा नाही बोलायची मी तसंच काहीसं बडबडतो.
मग ठरतं आपण नात्यात घेऊया ब्रेक...काही काळ....जपुया एकमेकांची स्पेस....जगू देऊ एकमेकांना हवं तसं काही काळ....
.
ब्रेक सुरू होतो....
पहिला राग whatsapp च्या प्रोफाइल फोटो वर निघतो.
तो उडवला जातो... नेट बंद करून मोबाईल बाजूला फेकला जातो....
फोन ठेवताना साखर घेतल्याशिवाय सवय नसलेल्या मला असा फोन ठेवला म्हणून अधिक वाईट वाटतं. सगळं रितं वाटू लागतं. एकटं राहण्यासाठी मागितलेल्या वेळात एकाकी झाल्याची भावना येते मनात.
पुन्हा आपल्या कामात मन गुंतवावं वाटतं. केला जातो प्रयत्न पण लागत नाही मन कशातही.....
एकट्याची चिडचिड अजून वाढते...
तुझही होत असावं बहुतेक तसेच काहीसे....
काही वेळ निघून जातो मध्ये.... 
मग अचानक Involuntary हालचाली प्रमाणे तुला "काय करतेस ?" msg type केला जातो पण येतं लक्षात आपण घेतलाय ब्रेक नात्यात.... 
परत बॅकस्पेस दाबून सगळं इरेज केलं जातं. फोन बाजूला ठेवला जातो. 
पुन्हा काही काळ निघून जातो मध्ये.
.
तुझं माझं उठणं, अंघोळ ,नाश्ता, चहा, जेवण ,आराम, काम, सायंकाळ, पुन्हा जेवण, आजार, जखमा,औषधांची नावं, घर, घरची स्थिती, एकमेकांच्या घरातले वादविवाद, प्रॉब्लेम्स , सगळ्या तारखा हे सगळं सगळं एकमेकांना ठाऊक असतं किंबहुना आपण share करतो ग. पण आज सगळं थांबल्यावर कळतं की तू सवय नाहीये व्यसन आहेस माझं. तुझ्याशिवाय नाही येत जगता... हसणं हरवतं.... डोळे पाणावतात. मी एकाकी पडतो. 
तुला हसत असताना बघणं आणि तुला हसवणं मला माझी जबाबदारी वाटते. तुला रडताना बघितलं की मी हरल्यासारखं वाटतं.आज तू असं चिडून , ओरडून, रडून फोन ठेवल्यावर काय अवस्था असेल माझी. 
तुझ्यापासून काही काळ दुर राहिलो की तुझ्या अजून जास्त जवळ आलोय हे लक्षात येतं. नाही राहता येत तुझ्या शिवाय हे उमगू लागतं. 
पुन्हा काही वेळ जातो मध्ये...
नात्यातल्या ब्रेक मुळे कळतं की किती गरज आहे मला तुझी.... 
तुलाही माझी असेल का?
फोटो सौजन्य : Google images 

शेवटी न राहवून तुला कॉल करायचा म्हणून मोबाईल हातात घेतो . तेवढ्यात 

तुझाच इनकमिंग कॉल नोटिफिकेशन दिसू लागतं. असंख्य विचार क्षणात डोक्यात येऊन जातात. 
फोन उचलतो....काहीच बोलत नाही मी.
तिकडून तुझा गहिवरलेला आवाज येतो....
"Missing you Partner" 😥

मी ही जोराचा उसासा घेतो...गहिवर आवरतो. 
अन बोलतो...
"I MISSED YOU ALOT" ❤️
.
बघ ना, कधीकधी मोबाईलला सुद्धा नेटवर्क नीट येण्यासाठी किंवा हँग झालेला मोबाईल चांगला चालावा म्हणून करतोच ना आपण मोबाईल reboot. 
तसंच काहीसं असतं नात्याचं सुद्धा. 
एकमेकांशी बोलत राहून भांडत बसण्यापेक्षा थोडा ब्रेक घेऊन एकमेकांना एकमेकांची किंमत, आयुष्यात जोडीदाराची गरज कितीय हे स्वतः उमगू देणं कधीही चांगलं.
म्हणून, 
खरंच नात्यात एक ब्रेक गरजेचा असतो.....
एकमेकांच्या अजून जवळ येण्यासाठी... 😇❤️

#तुझाच पार्टनर ❤️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा