सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

📚शिक्षक दिन...📖 ०५ सप्टेंबर २०१६....🎓✍🏻

📚शिक्षक दिन .....🎓✍🏻
       आजवरच्या माझ्या जीवनप्रवासात अनेक गुरुवर्य लाभले. प्रथम लाभले माझे आई-बाबा. त्यानंतर शालेय जीवनातले गुरुजी-बाई (गुरुजींचे धोतर-टोपी अन बाईंनी दिलेला धपाटा अजूनही चांगलाच ध्यानात आहे 😃). काही व्यावसायिक अभ्यासक्रमातले तर काही महाविद्यालयातले. काही जीवनप्रवासात कायम साथ दिलेले माझे प्रिय मित्र-मैत्रिण तर कधी कधी गाडीच्या प्रवासात अल्प काळासाठी भेटलेले पण आयुष्यभर पुरेल अशी शिकवण देऊन गेलेले सहप्रवासीही.....!👫👬
           आई-बाबा, गुरुवर्य ह्या साऱ्यांनी जीवन जगायला आणि उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवलं. काहींनी लिहिलेलं वाचायला शिकवलं तर काहींनी माणसं वाचायला. काहींनी मैत्रीतलं प्रेम शिकवलं तर काहींनी प्रेमातील मैत्री. काही गुरूवर्यांनी आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून कसं घायचं हे शिकवलं तर काहींनी दुसऱ्याच्या दुःखात आपण सामील कसं व्हायचं ह्याची शिकवण दिली.
अनेक जणांनी हसायला शिकवलं तर काही रडायचं शिकवून गेले. एकाच माणसाचे अनेक चेहरे काही जण दाखवून गेले. 
         अनेक कवी-लेखकांनीही जीवन समृद्ध केलं. जीवनात रसिकता भरली. त्यापैकी खासकरून व.पु.काळे आणि पु.ल.देशपांडे ह्यांचे नाव अग्रक्रमी येईल. वपुंनी 'माणूस शोधायला' शिकवलं तर पुलंनी हसवता हसवता थेट भावनांना हात घातला......!
      काही गुरुवर्य अंतराने कितीही दूर असले तरी त्यांचा आशिर्वाद, शुभेच्छा कायमच सोबत आहेत. त्यांनीच जगण्याला खरी दिशा दिली. जगण्याला बळ दिलं.
        काही शिक्षक का कुणास ठाऊक पण 'कायम अप्रिय' ह्या श्रेणीतील होते/आहेत, याचीही प्रांजळपणे कबुली देतो. त्यांनीही जीवनाचे अनेक पाठ शिकवले. 
          अशा माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात भेटलेल्या माझ्या सर्व गुरुजनांना आजच्या या *शिक्षक दिनाच्या शतकोटी शुभेच्छा !*
(काही शत्रूही झाले ह्या प्रवासात. ज्यांनी आयुष्यभर पुरेल अशी मोलाची शिकवण दिली. त्यांनाही शुभेच्छा !💐)

सर्वांसाठी ह्या चार ओळी,
"भरकटलेली नौका आमची
गुरुजी तुम्हीच किनारी नेली,
ओबडधोबड दगड होतो
तुम्हीच सुंदर मूर्ती केली.....!"


✍©तुषार वाजे, खेड,ता.इगतपुरी,नाशिक.
दि.०५ सप्टेंबर २०१६(गणेश चतुर्थी)


1 टिप्पणी: