मंगळवार, १७ मे, २०१६

🎨आठवणींची पेटी......📓

काल अडगळीच्या खोलीमधली 
आठवणींची पेटी चाळत होतो,
एकेक दिवस आठवून जुना
नकळत टिपं गाळत होतो.....

फुटलेली पाटी अन पेन्सिलचे तुकडे
सारं सारं त्यात भेटलं
पुन्हा एकदा लहान होऊन 
शाळेत जाऊन बसावसं वाटलं......

त्यातच होती गृहपाठाची
जीर्ण झालेली माझी वही,
बहुतेकदा मिळालेला 'उत्तम' शेरा
अन तारखेसह गुरुजींची सही......

एका गणिताच्या वहीमध्ये तर
चुका सतराशे साठ होत्या,
पण मराठीच्या पुस्तकातील कविता मात्र
अजूनही मला तोंडपाठ होत्या......


वहीच्या शेवटच्या पानांवर तर
रेघोट्यांचा थवा उतरला होता
लहानपणीचा काळच जणू
त्या पानांवर चितारला होता....

गुरुजींचा धपाटा बाईंची छडी 
सारं काही आठवत होतं
मागं सोडून आल्या दिवसात 
मला पुन्हा एकदा पाठवत होतं.....

चिंचा बोरं खोबऱ्याच्या गोळ्या
मुद्दाम काढलेल्या पोरींच्या खोड्या,
छत्री असतानाही पावसात भिजणं
अन पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या....

बघता बघता आजूबाजूला जणू
पोरांचा घोळका जमू लागला,
'बे एके बे' चा मोठ्ठा आवाज
चोहीकडे माझ्या घुमू लागला....

पेटीमधली प्रत्येक  गोष्ट
आयुष्य माझं सजवून गेली....
दिप्या, पक्या, नित्याची आठवण
डोळे चिंब भिजवून गेली......😓

✍काव्यांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा