सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

📚शिक्षक दिन...📖 ०५ सप्टेंबर २०१६....🎓✍🏻

📚शिक्षक दिन .....🎓✍🏻
       आजवरच्या माझ्या जीवनप्रवासात अनेक गुरुवर्य लाभले. प्रथम लाभले माझे आई-बाबा. त्यानंतर शालेय जीवनातले गुरुजी-बाई (गुरुजींचे धोतर-टोपी अन बाईंनी दिलेला धपाटा अजूनही चांगलाच ध्यानात आहे 😃). काही व्यावसायिक अभ्यासक्रमातले तर काही महाविद्यालयातले. काही जीवनप्रवासात कायम साथ दिलेले माझे प्रिय मित्र-मैत्रिण तर कधी कधी गाडीच्या प्रवासात अल्प काळासाठी भेटलेले पण आयुष्यभर पुरेल अशी शिकवण देऊन गेलेले सहप्रवासीही.....!👫👬
           आई-बाबा, गुरुवर्य ह्या साऱ्यांनी जीवन जगायला आणि उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवलं. काहींनी लिहिलेलं वाचायला शिकवलं तर काहींनी माणसं वाचायला. काहींनी मैत्रीतलं प्रेम शिकवलं तर काहींनी प्रेमातील मैत्री. काही गुरूवर्यांनी आपल्या आनंदात दुसऱ्याला सामावून कसं घायचं हे शिकवलं तर काहींनी दुसऱ्याच्या दुःखात आपण सामील कसं व्हायचं ह्याची शिकवण दिली.
अनेक जणांनी हसायला शिकवलं तर काही रडायचं शिकवून गेले. एकाच माणसाचे अनेक चेहरे काही जण दाखवून गेले. 
         अनेक कवी-लेखकांनीही जीवन समृद्ध केलं. जीवनात रसिकता भरली. त्यापैकी खासकरून व.पु.काळे आणि पु.ल.देशपांडे ह्यांचे नाव अग्रक्रमी येईल. वपुंनी 'माणूस शोधायला' शिकवलं तर पुलंनी हसवता हसवता थेट भावनांना हात घातला......!
      काही गुरुवर्य अंतराने कितीही दूर असले तरी त्यांचा आशिर्वाद, शुभेच्छा कायमच सोबत आहेत. त्यांनीच जगण्याला खरी दिशा दिली. जगण्याला बळ दिलं.
        काही शिक्षक का कुणास ठाऊक पण 'कायम अप्रिय' ह्या श्रेणीतील होते/आहेत, याचीही प्रांजळपणे कबुली देतो. त्यांनीही जीवनाचे अनेक पाठ शिकवले. 
          अशा माझ्या आजवरच्या जीवनप्रवासात भेटलेल्या माझ्या सर्व गुरुजनांना आजच्या या *शिक्षक दिनाच्या शतकोटी शुभेच्छा !*
(काही शत्रूही झाले ह्या प्रवासात. ज्यांनी आयुष्यभर पुरेल अशी मोलाची शिकवण दिली. त्यांनाही शुभेच्छा !💐)

सर्वांसाठी ह्या चार ओळी,
"भरकटलेली नौका आमची
गुरुजी तुम्हीच किनारी नेली,
ओबडधोबड दगड होतो
तुम्हीच सुंदर मूर्ती केली.....!"


✍©तुषार वाजे, खेड,ता.इगतपुरी,नाशिक.
दि.०५ सप्टेंबर २०१६(गणेश चतुर्थी)


रविवार, १० जुलै, २०१६

माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓.....

(सन 2015 च्या पहिल्या दिवशी कॉलेजच्या कविता संग्रहासाठी लिहिलेली हि कविता......)

🌹🍁माणूसकीचं गीत....../(कॅलेंडर)🗓....

कॅलेंडरची बारा पानं बघता बघता संपून गेली🗓
कडू-गोड भूतकाळाची आठवण मात्र ठेऊन गेली.....!

मंगळावरच्या झेपेनं छाती सर्वांची फुलली होती,
आसाम पेशावरच्या हल्ल्यांनी काजळकाठ भिजली होती....!

खून दहशत बलात्काराची गर्द छाया पडली होती,
डोळ्यांचं तर सोडाच मित्रांनो, प्रत्येक पापणी सुद्धा रडली होती.....!

पण जुन्या दुःखाना आता किती उगाळत बसायचं
उलटून गेल्या काळावरती किती दिवस रुसायचं....!

पुढ्यात ठाकलेल्या वर्षासाठी चला नवे संकल्प करू
स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आयुष्यात नवे रंग भरू.....!

स्वप्न आणि आकांक्षांचे लावून नवे पंख,
झटकून टाकूया आयुष्यातल्या निराशेचे डंख....

मंद झालेल्या पणतीसाठी लख्ख नवी वात बनू,
विंदांच्या कवितेमधल्या देणाऱ्याचे हात बनू.....!

लहान मोठ्यांना सामावून घेणारी पुण्यशील जागा बनू,
उसवली मनं जोडणारा आपुलकीचा धागा बनू.....!

तुझं माझं विसरायला लावणारी ऐक्याची प्रीत बनू,
'माणूस' म्हणून जगायचं शिकवील असं 'माणूसकीचं गीत' बनू......!

(पुढ्यात ठाकलेल्या नववर्षाचं चला करूया सोनं, कारण
समोर आलंय एक नवीन कॅलेंडर अन त्याची बारा पानं......)

©✍तुषार वाजे....🍁
दि. 1 जानेवारी 2015.....
http://www.tusharwaje91.blogspot.com

शनिवार, ९ जुलै, २०१६

आरसा......'तो' आणि 'मी'......

🍁आरसा....👥

तिच्यापासून वेगळं झालेल्या त्यानं
आता स्वतःला थोडंस सावरलंय,
डोळ्यांतून निरंतर वाहणारं पाणी
त्यानं कसंबसं आवरलंय.......

आता तो पहिल्यासारखं 
तासनतास रडत नाही....
एकट्यानं कसं जगायचं ? हा प्रश्न
रोजरोज त्याला पडत नाही.....

कोणी म्हणतं ती सोडून गेली त्याला
तर कोणी म्हणतो त्यानंच तिला सोडलं,
पण एकदा मला बोलला होता तो गहिवरून,
"आमचं ना त्या विधात्यानेच मोडलं !"......💔

तिच्या कित्येक आठवणी त्यानं
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवल्यात,
कुणालाही सापडणार नाही कधीच
अशा ठिकाणी लपवून ठेवल्यात......

तिची बिंदी, पत्र, फोटो अन सोबत पाहिलेल्या
सिनेमाची तिकिटं.....
असं सारं सारं आता तो क्वचितच बाहेर काढतो,
पण वळीवही थिटा पडेल त्याच्यापुढं
इतका त्या दिवशी रडतो.......

रडून मन हलकं करतो तो
अन भरभर आठवणी आवरून घेतो,
कुणीतरी रडताना बघायच्या आतच
स्वतःला कसाबसा सावरून घेतो.....

एकजण बोलला त्या दिवशी की,
"त्या दूरगावच्या लोकांनी पूर्वी त्याला हसताना पाहिलंय
गप्पा गोष्टी करत
मित्रांसोबत बसतानाही पाहिलंय".....

पूर्वीप्रमाणे तो आता हसत नाही अन
मौन बाळगून आता नेहमीच शांत राहतो,
घरात जोरजोरात टिकटिकणारी घड्याळं
आणि सोबतीला फक्त एकांत राहतो......

का कुणास ठाऊक पण,
या कवितेतील 'तो' मला कित्येकदा
माझ्याचसारखा भासू लागतो,
आरशात जेव्हा बघतो मी स्वतःला
समोर तोच दिसू लागतो.......! 👥

✍तुषार 👥🍁

सोमवार, २० जून, २०१६

बाप......#HappyFathersday

🍁 *ही कविता, घराची काळजी वाहताना कायमच स्वतःची स्वप्न हरवून बसलेल्या अन तरीही कवी लेखकांनी ज्याच्यासाठी नेहमीच कमी लेखणी संपवली अशा प्रत्येक  'बापासाठी'*.....

✍🏻 *वसुदेवाचा विसर....!*
आई बापाची गोष्ट सांगताना
थोडं चुकीचंच घडलं
बापाच्या तुलनेत आईच्या पारड्यात
नेहमीच जास्तीचं पडलं.....⚖


चूक आपली नाहीच त्यात कारण

आपल्याला नेहमी आईचेच अश्रू दिसलेत
पण त्या अश्रूंचा हिशोबच कुठंय ?
जे बापानं आडोशाला जाऊन पुसलेत.....


शांत कठोर रागावणारा अन

मारणारा बाप प्रत्येकानं पाहिला
पण त्याच्या हृदयाचा हळवा कोपरा
कायम अंधारातच राहिला......



आपल्यातच सारी स्वप्न बघतोय बाप

जी त्यानं कधी पाहिलीय,
पोरांचं आयुष्य घडवण्यातच त्यानं
पूरी जिंदगी वाहिलीय.......


नशिबानं दिलेले चटक्यांमुळं आयुष्यभर

बाप कधी हसलाच नाही,
आईच्या पायांच्या भेगांआडून बापाचा 
फाटका सदरा कुणाला दिसलाच नाही.....


तिची थोरवी गाताना कायम

नकळत एक गुन्हा घडलाय,
देवकी यशोदेच्या प्रेमापुढं
वसुदेवाचा साऱ्यांनाच विसर पडलाय..........😥


✍🏻-तुषार वाजे 🍁

#HAPPYFATHERSDAY
#LuvUdada

रविवार, ५ जून, २०१६

🌳एक वृक्ष की पुकार 🌲

🍁🌴जागतिक पर्यावरण दिन की शुभकामनाएं 🌳🌲

तेज़ धुप से बचकर मै एक 
वृक्ष के नीचे सो रहा था,
नींद उडी जब सुना स्वयं एक
वृक्ष वही पर रो रहा था......।🌳😥

पूछा मैंने हैरानी से 
क्या हुआ? क्यों रो रहे हो ?
"अकेला हो रहा वृक्ष यह जिसके*
छाँव मे तुम सो रहे हो....।"

बरसो बीते इस बात को
जब जग भी सारा हरा-भरा था....🌾🌳🌷
खिलखिलाती थी सारी दुनिया 
नाम उसका *वसुंधरा* था....।🌏

काँट दिए वह भी वृक्ष जिसपर 
घर बसते थे परिंदों के.....🕊
हात न काँपे किंचित भी उसवक्त
जालिम उन दरिंदो के.... ।👺

ऊष्मा प्रचण्ड बढ़े तेज़ी से🔥
रास्तो को यंत्र से भर दिया ...🏎🏍🚍🚕🚗
साँसों को नहीं रही स्वच्छ हवा
गंगा को भी मैला कर दिया ....।

कर दिया सबने कलुषित धरा को
अब न आते वसंत बहार
सोच तू दिल से जित नही तेरी
यह तो मानवजाति का संहार .....😱

क़ुदरत का कानून हैं यह
न बदला था न बदल सकेगा ...
हात में तेरी मौत का तांडव 
रोक ले पगले बाद न रुकेगा....।

चिल्लाने का वक्त बिता अब
समय न गवां तू स्याही में ,✍🏻📰
शीघ्र कृति कर अब ना रुक तू
दो पेड़ लगा दे अमराई मे.....।🌳🌳
5 जून 2016
✍🏻 *तुषार वाजे (काव्यांजली)
#WorldEnvironmentDay
#www.tusharwaje91.blogspot.com


मंगळवार, १७ मे, २०१६

🎨आठवणींची पेटी......📓

काल अडगळीच्या खोलीमधली 
आठवणींची पेटी चाळत होतो,
एकेक दिवस आठवून जुना
नकळत टिपं गाळत होतो.....

फुटलेली पाटी अन पेन्सिलचे तुकडे
सारं सारं त्यात भेटलं
पुन्हा एकदा लहान होऊन 
शाळेत जाऊन बसावसं वाटलं......

त्यातच होती गृहपाठाची
जीर्ण झालेली माझी वही,
बहुतेकदा मिळालेला 'उत्तम' शेरा
अन तारखेसह गुरुजींची सही......

एका गणिताच्या वहीमध्ये तर
चुका सतराशे साठ होत्या,
पण मराठीच्या पुस्तकातील कविता मात्र
अजूनही मला तोंडपाठ होत्या......


वहीच्या शेवटच्या पानांवर तर
रेघोट्यांचा थवा उतरला होता
लहानपणीचा काळच जणू
त्या पानांवर चितारला होता....

गुरुजींचा धपाटा बाईंची छडी 
सारं काही आठवत होतं
मागं सोडून आल्या दिवसात 
मला पुन्हा एकदा पाठवत होतं.....

चिंचा बोरं खोबऱ्याच्या गोळ्या
मुद्दाम काढलेल्या पोरींच्या खोड्या,
छत्री असतानाही पावसात भिजणं
अन पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या....

बघता बघता आजूबाजूला जणू
पोरांचा घोळका जमू लागला,
'बे एके बे' चा मोठ्ठा आवाज
चोहीकडे माझ्या घुमू लागला....

पेटीमधली प्रत्येक  गोष्ट
आयुष्य माझं सजवून गेली....
दिप्या, पक्या, नित्याची आठवण
डोळे चिंब भिजवून गेली......😓

✍काव्यांजली

हजारो आठवणी राहून गेल्यात....

केव्हाची वाट पाहिली होती या दिवसाची,
पुढची स्वप्नं रंगवून ठेवली होती केव्हाची.
खुप उतावीळ होतो येथून जाण्यासाठी,
आयुष्याचे पुढचे वळण घेण्यासाठी.

पण का कोण जाणे ह्रदय आज दाटतंय,
वेळेला थांबवावसं सारखं वाटतंय.
का कोण जाणे आज काहीतरी खुपतंय,
असे का वाटतं की काहीतरी चुकतंय...?
म्हणायचो की खुप कठीण ही २ वर्षे जगुन गेलोय...,
पण आज वाटतंय काहीतरी नक्कीच मागे विसरुन गेलोय.....!
ज्ञात-अज्ञात अशा अनेक गोष्टी राहून गेल्या,
न विसरता येणा~या हजारो आठवणी राहून गेल्या.


आता पाठीमागून गुपचुप येऊन डोक्यात टपली कोण मारील,
माझं डोकं खाण्यासाठी कोण माझा पीछा करील?
उद्या जिथे २-२ हजारांचा हिशोब नसेल,
तिथे २-२ रुपयांसाठी कोण भांडण करीन,
रात्रभर जागुन आता दंगामस्ती कोण करीन?
कोण एकमेकांचा डबा न विचारता खाईल,
कोण आता मला नव्या नव्या नावाने हाक देईल?



मी आता विनाकारण कुणाशी भांडण करु, विना टाँपिक बकवास कुणासोबत करु?
कोण आता कमी मार्क पडल्यावर धीर देईन, कोण चुकून नंबर आल्यावर शिव्या देईन?
नवनवीन ठिकाणं आता कुणासोबत बघु,
रम्य ते जीवन एकटा कसा जगु.
खरंच असे मित्र कुठे मिळतील जे दरीत धक्का देतील, अन् वाचवायला स्वत:ही उडी घेतील.


माझे टाँट ऐकून त्रासून कोण जाईल,
कधी मला शांत बघुन हैरान कोण होईल?
कोण म्हणेल की तुषार तुझ्या जोकवर हसायला नाही येत, कोण म्हणेल मित्रा तुझ्याशिवाय कोण साथ नाही देत.
दंगामस्तीचा खेळ आता कुणासोबत खेळेन, कुणासोबत आता कंटाळवाणे लेक्चर झेलेन?
सरांच्या PJ वर पाठीमागून राक्षसासारखा कोण हसेल,
हारणा-याकडनं पार्टी अशा पैजेत आता कोण फसेल...?
माझ्या सर्टीफीकेट्सला रद्दी म्हणण्याची हिम्मत कोण करेल,
माझ्यासाठी खरा सल्ला देण्याचं धाडस कोण करेल.....?


डेस्कवर आता मी कुणासोबत जाईल, ज्युनियर्सला फालतूचे सल्ले कसे देईल?
अचानक.... विनाकारण.... कुणालाही पाहून वेड्यासारखं हसणं कुणास ठाउक कधी होईल,
एकदा तरी म्हणा ना दोस्तांनो पुन्हा सारं होईल....!
मित्रांसाठी सर/ मॅडम शी आता कोण भांडेल,
पुन्हा हसण्या-रडण्याचा डाव कोण मांडेल ?


रात्रीचे २-२ वाजता ढाब्यावर चहा प्यायला कोण जाईल,
आपल्या बेसूर आवाजात खास मित्रांसाठी गाणं कोण गाईल?
कोण मला माझ्या हुशारीचा भरोसा देईल आणि कोण मला हवेत जास्त उडाल्यावर पुन्हा जमीनीवर घेउन येईल?
माझ्या आनंदात खरंच आनंदी कोण होईल, माझ्या दु:खात माझ्यापेक्षा दु:खी कोण होईल....?
माझी ही कविता कोण वाचेल,
कोण तिला खरंच समजेल?


खुप काही लिहायचे बाकी आहे, काही साथ बहुतेक बाकी आहे.
फक्त एकाच गोष्टीची भिती वाटते मित्रांनो, आपण अनोळखी ना बनून जावो मित्रांनो.
जीवनाच्या रंगात मैत्रीचा रंग फिका ना पडून जावो (मित्रांनो),
कधी असे ना होवो की दुस-या नात्याच्या गर्दीत मैत्रीच हरवून जावो (मित्रांनो).
जीवनात पुन्हा भेटण्याचं वचन देत जा,
जर नाहीच कधी भेटता आलं तर आठवण काढत जा.
पाहीजे तेवढे हसून घ्या आज माझ्यावर मी वाईट नाही वाटुन घेणार,
ह्याच हसण्याला ह्रदयात साठवून घेणार, अन् आठवण येईल जेव्हा तुमची तेच हसु थोडसं गालावर येऊ देणार.
...तुषार है मेरा नाम , और ये था मेरे दोस्तो के लिए एक छोटासा पैगाम....


     ✍🏻✍🏻♥♥*तुषार वाजे*♥♥


सोम. दि.०९ जुलै २०१२
वेळ- सायं.०५:३५ मि